विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप!
मुंबई : घटनात्मक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. असे असले तरी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या आपल्या पहिल्या कारकीर्दीत पक्षातंर बंदी कायदा मोडीत काढून लोकशाही व संविधानाच्या छातीत सुरा खुपण्याचे काम केले, म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या नातेवाईकांसाठी अत्यंत खालच्या पातळीवर उतरले आहेत. विरोधकांना अर्ज भरू देण्यात अडथळा आणणे, विरोधकांना धमक्या देणे, पदाचा गैरवापर करणे अशा प्रकारचे वर्तन त्यांनी केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, नार्वेकर यांना पदावर कायम ठेवणे म्हणजे विधानसभेचे पावित्र्य भंग होण्यासारखे अशल्याची टीकाही सपकाळ यांनी केली.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना धमकावल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाने चौकशी करण्याची तसेच नार्वेकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पत्र पाठवले होते पण निवडणुक आयोगाने पुरावे मागितले. घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यांना अडवण्यात आले, धमक्या दिल्या त्यांच्या तक्रारी घेऊन कारवाई करावी. आता चौकशी अहवाल आला असला तरी त्यात केवळ शब्दच्छल करण्यात आलेला आहे, असेही सपकाळ म्हणाले.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष व्हाव्यात या धोरणाला हरताळ फासण्यात आला असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लोकशाही गुंडाळून पैशाचा खेळ सुरू केला आहे. मतदानाआधीच भाजपा महायुतीचा घोडेबाजार सुरू असून सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहोचली असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
निकोप लोकशाहीत विरोधी पक्षांनाही तेवढेच महत्त्व आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात सहा बिगर काँग्रेसचे मंत्री होते, ही आपली संस्कृती व परंपरा आहे पण विरोधकच नको अशी प्रवृत्ती भाजपा व महायुतीची बनली असून त्यातून बिनविरोधसाठी सत्ताधारी कोणत्याही थराला जात असल्याची टीका केली. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला अर्ज भरू न देणे, धमक्या देणे, दबाव तंत्राचा वापर करणे त्याचबरोबर पोलीस, प्रशासन यांच्या मदतीने बेशरमपणाचा खेळ सुरू आहे आणि निवडणूक आयोग मात्र याचा मूक साक्षीदार बनला आहे, याचा आम्ही निषेध करतो. लोकशाहीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ‘नोटा’चा पर्यायही आहे, बिनविरोधच्या ठिकाणी मतदारांना ‘नोटा’ वापरण्याची संधी द्यावी, असे सपकाळ म्हणाले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेतील तीन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले असून तेच एकमेकांवर टीका करत आहेत, हा प्रकार ‘मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर’, असा असून महायुतीत ‘नुरा कुस्ती’ सुरु आहे. एवढेच गंभीर आहेत तर अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे नाहीतर भाजपाने अजित पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.




