अॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
पाचगणी : अमर एज्युकेशनल अँड सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संचलित अॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाचगणी येथे आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक विश्वस्त मा. श्री. अमर विजय बिरामणे, मा. श्री. विजय बिरामणे, मा. सौ. रंजना विजय बिरामणे , मा. सौ. सारिका नरेंद्र बिरामणे आणि मा. सौ. प्रज्ञा अमर बिरामणे यांनी प्रमुख पाहुणे मा. श्री. दानवले गुरुजी, गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मा. श्री. सचिन बनसोडे, उद्योजक मा. श्री. अमित जोते आणि उद्योजक मा. श्री. संदेश भोईर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठलाची आरती सादर केली. पुढे विद्यार्थ्यांनी भक्तिरसपूर्ण भजन, पारंपरिक नृत्य तसेच आषाढी एकादशीचे महत्त्व आणि वारकरी संप्रदायातील भक्ती, समता व सेवाभाव यांचा संदेश देणारी नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सांगता पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने दिंडीत सहभाग घेत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी शाळेने राबविलेल्या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, नियोजन आणि समर्पित कार्य यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त, एकात्मता आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदराची भावना दृढ होत असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.





