अरुणिमाचे धैर्य घेऊन आयुष्यातील ध्येयाचे एव्हरेस्ट सर करा- प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
कोपर्डेच्या नागाईदेवी विद्यालयात १० वीच्या विद्यार्थ्यांना ,सम्यक उपदेश
सातारा : अडचणी ,संकटे ,समस्या आयुष्यात येतातच खरे तर आपण जगणे म्हणजे या समस्या प्रभावीपणे सोडविणे असते. यांत्रिक पाय लावून एव्हरेस्ट सर करणारी अरुणिमा ही जगाची प्रेरणा झालेली आहे. धैर्याने संकटाशी मुकाबला करून ध्येय पूर्ण करणे हेच जीवन आहे. अरुणिमा सिन्हा या अपघातात जिचे पाय गेले या मुलीने जिद्दीने एव्हरेस्ट शिखरावर झेंडे लावले. रेल्वेतून फेकून दिलेल्या या मुलीच्या पायावरून ४९ रेल्वे गाड्या गेल्या तरी ती जिवंत राहिली .अरुणिमाची शपथ घ्या. माणसात जिगर पाहिजे. मी झुंज देत प्राध्यापक झालो आहे. मी स्वतःला म्हातारा कधी समजत नाही . केसावर जाऊ नका. माणूस त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो . आपले कर्तृत्व तेजस्वी ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे..आपण पृथ्वीतलावर फार थोडे दिवस असू. म्हणूनच अरुणिमाचे धैर्य घेऊन आयुष्यातील ध्येयाचे एव्हरेस्ट सर करा’ असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते कोपर्डे येथील नागाईदेवी विद्यालयाच्या १० वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी यश मिळण्यासाठी शुभचिंतन ,आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आयोजित केलेल्या शुभेच्छा समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी अधिकारी रघुनंदन मंत्री होते. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव कदम, उपाध्यक्ष भालचंद्र घार्गे ,सचिव अरुण निकम ,दीपक निकम, , मुख्याध्यापक कैलास सुळे इत्यादींची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की ‘’ मुलींचा जन्म रडण्यासाठी नाही .लढण्यासाठी आहे. त्याच पुढच्या काळात देशाचे काम करतील.आपली हिम्मत वाढवण्यासाठी काम केले पाहिजे . मुली शिक्षणात पुढे ,मुले मागे असेही एक चित्र आहे. शिक्षण मार्क्ससाठी केवळ नसते तर जीवन घडविण्यासाठी असते. शिक्षणाने स्वतःचे आणि देशाचे हित करायला हवे. संगीत वाजवणाऱ्या मुलीना ते म्हणाले की अशी मुले जीवन सुंदर करणारी आहेत . मनात चांगुलपणाचे कोंब निर्माण झाले पाहिजेत. हे खरे तर शिक्षणाचे काम आहे. आपण चुका न करता,आपण दुसरयाला खड्ड्यात न पाडता चांगल्या रस्त्याला न्यायला पाहिजेत. कार्तीकीने हे बन सुंदर केले आहे . या शाळेचे शिक्षक जिवंत वाटतात. प्रेरणादायी शिक्षक देशाला जबाबदार नागरिक देतात. शिक्षक चांगले असतील तर चांगल्या गोष्टी पेरले पाहिजे. चांगले होण्यासाठी परिश्रम घेण्याची गरज आहे.
इंग्रजी शाळेमुळे मराठी भाषेच्या शाळांची संख्या कमी झाली. आर्थिक दृष्ट्या श्रीमंत मुले फक्त इंग्रजी शाळेत जातात.गरिबांच्या मुलांसाठी मराठी शाळा आहे असे वाटते. मराठी शाळाना पुन्हा प्रतिष्ठा व्हायला पाहिजे .इंग्रजी सहित मराठी शाळा चालली पाहिजे .कुठल्याच भाषेचा दुस्वास करू नका .कारण त्या भाषा माणसांच्या आहेत. ज्या भाषा व्यवहार ज्ञान,उद्योग व्यवसाय,नोकऱ्या उपलब्ध होतात ,त्या भाषेला महत्व येणे साहजिकच आहे, पण आज अंतरराष्ट्रीय स्तरावर जे प्रगत देश आहेत,त्यांना त्यांच्या भाषेत बोलणारी माणसे कामाला हवी आहेत. आपले काम आणि भाषा यामुळे आपली किंमत वाढते मी १० वी पाच विषयात नापास असलो तरी तो मला मिळालेल्या परिस्थितीचा भाग होता.कोपर्डेच्या या विद्यालयाने खूप चांगले पर्यावरण दिले आहे. आपली परिस्थिती वाईट असेल तर,आपण परिस्थिती चांगली करण्याची हिम्मत मनात आली पाहिजे. १०वीच्या मुलाच्या पाठ्यपुस्तकात जे आज ज्ञान आहे,ते मला एम.ए.चे अभ्यासक्रमात दिसत नाही. खूप प्रेरणादायी अभ्यासक्रम १० वीचा आहे.. म्हणून सत्य आणि सदाचाराने यश मिळवा.कॉपी करून पास होणे हे हीन दर्जाचे लक्षण आहे. जिवंत आहोत म्हणून, जगायचे म्हणून जगू नये. आपल्या अनमोल कार्याने जिवंत रहावे. आपल्या मनातले फुल स्वयंप्रेरणेने टवटवीत ठेवा. त्यांनी येग येग साताऱ्याला,आणि हसा मुलानो हसा ही गीते गाऊन मुलांना आनंदी केले. छत्रपती शिवाजी कोलेजला ११ वीला असताना आपण गीत लेखन केल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्याचे अनुकरण करा,कला शिका, देश आणि पर देशात जायची तयारी ठेवा. आपली मुले ,मुली पुढच्या काळात जगात विमानाने जातील. गुणवत्ता तयार करा. हणमंतराव गायकवाड यांनी ८ माणसाना घेऊन बी.व्ही.जी कंपनी सुरु केली आज १ लाख जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. भारत आणि जगातील अनेक शासकीय संस्थांचे स्वच्छतेचे काम ते करतात. नोकरी नाही मिळाली तरी स्वतंत्र व्यवसाय करून आपण सक्षम झाले पाहिजे. मोठी माणसे कष्टाने ,जिद्दीने मोठी होतात असेही ते म्हणाले. प्रा.वाघमारे यांनी रघुनंदन मंत्री यांनी शाळेसाठी शौच्छालय बांधून दिल्याबद्दल त्यांच्या दानकार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना लार्सन अंड टूब्रो तील सेवानिवृत्त अधिकारी रघुनंदन जगन्नाथ मंत्री म्हणाले ‘ करीयर साध्य करायचे असेल तर चांगले काय ,वाईट काय याची जाण करून घ्या .ज्याला मन विरोध करते ते असतात कठोर परिश्रम. पण कठोर परिश्रम करण्याची तयारी सतत ठेवली पाहिजे .तुम्हाला जे कुणी व्हायचे आहे ,त्यांचे स्वप्न सतत पहात राहा . दृश्यमान स्वप्न हवे विश्व तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्याकडे घेऊन जाईल. नेहमी पालक आणि शिक्षक यांच्याबद्दल कृतद्न्य राहा .करीयर निवडून यश मिळेपर्यंत सोशल मिडीया पासून अलिप्त रहा ,असा उपदेश त्यांनी यावेळी मुलांना केला.
प्रारंभी संस्थापक बाळासाहेब कदम यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.मुलीनी स्वागत गीत गायन केले. एस.एस .क्षीरसागर यांनी परिचय करून दिला. कु.संजना कांबळे ,ऋतुजा कदम, कादंबरी करांडे ,नम्रता निंबाळकर,शिक्षक एस.एस क्षीरसागर यांनी मनोगते व्यक्त केली. किशोर टोणपे यांनी सूत्र संचालन केले तर दशरथ गोरड यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुनील काजळे,,अन्नासो निंबाळकर ,सतीश घोडके ,कैलास सुळे,आणणा इंगूळकर ,सर्व संचालक , ,तुकाईवाडी ,सायली, व कोपर्डे येथील पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.
