अर्ज करूनही ‘आरटीई’मध्ये अद्यापही प्रवेश मिळाला नसेल तर हे करा, शेवटची संधी
सातारा -मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये (अल्पसंख्याक शाळा वगळून) २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.
प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ७३ हजार ६१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्याप ३१ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी संधी दिल्यानंतर आणखी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन फेऱ्या राबवण्यात आल्या. त्यानंतरही जागा रिक्त असल्याने आता अर्जदारांना संधी कशी मिळेल, त्यासाठी काय कराल याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
अशी राहणार तिसरी फेरी
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या फेरीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी १२ सप्टेंबरपर्यंत तालुका पडताळणी समितीकडे संपूर्ण कागदपत्रासह प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
न्यायालयाने खासगी शाळांना सुनावले
आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा दिलेला आदेश हा केवळ राज्य शिक्षण मंडळालाच नाही, तर सगळ्या शिक्षण मंडळांना लागू आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, या शिक्षण मंडळांशी संलग्न खासगी शाळांनी सध्याच्या विद्यार्थी संख्येपेक्षा अतिरिक्त प्रवेश देण्यास हरकत नाही, असे नमूद केले. तसेच परवानगी मिळत नसल्याची सबबी सांगू नका, असेही न्यायालयाने खासगी शाळांना सुनावले.