इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
सातारा : इतर मागास बहुजन कल्याण, विभागाकडून राज्यातील महानगर पालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय / तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक विभागातील प्रथम वर्षातील विदयार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिमाह भोजन भत्ता रुपये ४,५००/- निर्वाह भत्ता प्रतिमाह रुपये ६००/-, मुलींकरीता स्वच्छता भत्ता प्रतिमाह रुपये २००/-, नाईट ड्रेस, महाविदयालयीन गणवेश, शैक्षणिक सहल, प्रोजेक्ट रिपोर्ट याकरीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो.
तरी सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत.





