हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा.
दिनांक 1 जानेवारी ते 6 जानेवारी पर्यंत सुरू असलेला हिंदवी पब्लिक स्कूलचा क्रीडा महोत्सव शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहात पार पडला. छत्रपती शाहू स्टेडियम येथे दिनांक 6 जानेवारी रोजी या क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा खो – खो असोसिएशनचे सेक्रेटरी श्री महेंद्र गाढवे सर उपस्थित होते. सरांनी आपल्या भाषणात सातारा जिल्ह्यातील हिंदू संस्कृती जपणारी पहिली शाळा असे गौरवोद्गार काढले. क्रीडा शिक्षकांमुळे क्रीडा महोत्सव उत्कृष्ट होत असतो असे सांगताना क्रीडा शिक्षक श्री विनोद दाभाडे सर यांचे त्यांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले. इथून पुढेही ते असेच अनेक उत्तमोत्तम खेळाडू घडवतील अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी उपस्थित श्री मनोहर यादव सर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य क्रीडा व शा. शि. शिक्षक महासंघ यांनी शाहू स्टेडियमच्या क्रीडा संकुलाच्या मातीचा अभिमान असल्याचे सांगत हिंदवी परिवाराचा ही अभिमान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनेक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले यामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा, मल्लखांब सारख्या हिंदू संस्कृती जपणाऱ्या प्राचीन खेळांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय अमित सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. आपल्या भाषणात हिंदवी पब्लिक स्कूल ने 21 वर्षानंतर आज एक आदर्श प्रस्थापित केलाय असे सांगत त्यांनी शिक्षक व पालकांचे कौतुक केले. हिंदवी पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या निगडी, ज्ञानप्रबोधिनीच्या गुरुकुल उपक्रमाबाबतही त्यांनी सांगितले.
स्कूलचा 21 वर्षांचा टप्पा पूर्ण करताना समाधान वाटत असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले तसेच सर्व क्रीडापटूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक विनोद सरांचेही विशेष कौतुक केले.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी स्कूलमध्ये व्यास, वशिष्ठ, सांदीपनी, आणि बृहस्पती असे चार विभागामध्ये विद्यार्थ्यांचे संघ केले आहेत. कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, डॉजबॉल, फुटबॉल, रनिंग, थाळी फेक, गोळा फेक अशा विविध खेळांमधून मोठ्या हिरीरीने भाग घेऊन सर्वच विद्यार्थ्यांनी क्रीडा सप्ताहाचा भरभरून आनंद घेतला. क्रीडा सप्ताहाची सांगता पारितोषिक वितरणाने करण्यात झाली.
कार्यक्रमाप्रसंगी हिंदवी पंचकोशाधरित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका सौ. रमणी कुलकर्णी मॅडम तसेच गुरुकुल प्रमुख श्री. संदीप जाधव सर, सेक्शन हेड, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रांजल जगदाळे व विद्यार्थिनी कृष्णाली डफळे यांनी केले. स्कूलचा स्पोर्ट्स कॅप्टन वेदांक जमदाडे याने विद्यार्थ्यांना खेळाचे नियम व शिस्तीचे पालन करण्याची शपथ दिली. प्रास्ताविक स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.मंजुषा बारटक्के यांनी तर आभार प्रदर्शनाचे काम व्हाईस प्रिन्सिपल शिल्पा पाटील यांनी केले.
