शाश्वत शिक्षणाचा पाया प्राचीन भारतीय परंपरेत –श्री.मुकुंदराव आफळे
सातारा : हिंदवी पब्लिक स्कूल ही शिक्षण संस्था राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय संस्कृतीचे व शास्त्रीय दृष्ट्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वांचा परिचय व्हावा यासाठी विविध शास्त्रांचे विकसन सिद्धांतिक मांडणीसह केलेल्या प्राचीन ऋषीमुनींची नावे देण्यात आली आहेत. शाळेमध्ये वावरत असताना विद्यार्थ्यांना सहजतेने भारतीय परंपरेचे, आपल्या पूर्वजांचा शास्त्रीय दृष्टिकोन व योगदान याचे आकलन व्हावे यासाठी हा अभिनव उपक्रम हिंदवी पब्लिक स्कूलने केला आहे.
हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये नुकताच ‘वर्गांचे नामकरण’ व ‘वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा’ साजरा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्री. मुकुंद आफळे, सौ. अर्चना आफळे, श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, हिंदवी पंचकोषाधारीत गुरुकुलाच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका मंजुषा बारटक्के उपमुख्यध्यापिका शिल्पा पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. मुकुंदराव आफळे म्हणाले, ‘आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये मार्कांची स्पर्धा जीवघेणी झालेली आहे. बाल शिक्षणापासून स्पर्धात्मक वातावरणात मुलांची जडणघडण होत आहे त्यामुळे मुलांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक, वैचारिक विकास कृतिशील शिक्षणातूनच घडून येईल. या प्रकारच्या शिक्षणाचे प्रयोग हिंदवी स्कूलमध्ये झालेले दिसतात.’
श्री. अमित कुलकर्णी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावं, यासाठी हिंदवी स्कूल सातत्याने प्रयत्न करत आहेत. प्राचीन भारतातील योगदानाचा आधुनिक भारताच्या जडणघडणीत असलेला प्रभाव विद्यार्थ्यांच्या लक्षात यावा यासाठी सर्व वर्गांना भारतीय परंपरेमध्ये असलेल्या ऋषींची नावे जसे की महर्षी आर्यभट्ट ,महर्षी ब्रह्मगुप्त, महर्षी कणाद, महर्षी चरक अशी माहितीसह देण्यात आली आहेत. भारतीय अद्भुत अलौकिक बौद्धिक क्षमता असणारे महर्षी व त्यांचे कार्य लक्षात घेऊन ते आचरणात आणणारे विद्यार्थी तयार करणे हाच या मागचा हेतू आहे.’
मान्यवरांचा परिचय देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ शीतल पोतदार यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.