मुंबई पुणे दृतगती महामार्गावरील अपघातग्रस्त टँकर अखेर बाजूला करण्यात यंत्रणांना यश वाहतूक सुरळीत
रायगड -पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गॅस टँकरला रायगड जिल्ह्यातील आडोशी बोगद्या जवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला, अपघातामुळे टँकरला तीन ठिकाणी गळती सुरू झाली. या गळतीमुळे टँकरमधून प्रॉपलिन हा अतिज्वलनशील वायू बाहेर येऊ लागला. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई मार्गिकेवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे मंगळवारी आणि बुधवारी आतोनात हाल झाले. बोरघाटात दहा ते पंधरा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवाशांना अन्न पाण्याविना तासंतास एकाच जागी बसून रहावे लागले होते, त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.
मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, महामार्ग पोलीस, औद्योगिक सुरक्षा दल, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, आपदा मित्र, हेल्प फाउंडेशन, बीपीसीएल, मेकॅलिक आणि रिलायन्स कंपनीची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली होती. मात्र गॅस गळती रोखण्यात यश येत नव्हते. शेवटी अपघातग्रस्त गॅस मधील गॅस दुसरे टँकर बोलावून त्यात भरण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया रात्री १० वाजेपर्यंत सुरु होती. नंतर उलटलेला टँकर उचलण्याचे काम हाती घेण्यात आले.
अपघातग्रस्त टँकरचा स्फोट होऊ नये यासाठी अग्निशमन दलांकडून पाण्याचे फवारे मारले जात होते. उलटलेला टँकर सरळ केल्यानंतर त्यातून पुन्हा गळती सुरू झाली. ती बंद करून पहाटे दीड वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त टँकर अखेर हटवण्यात आला. यानंतर मुंबई कडे येणारी मार्गिका वाहनांसाठी खुली करण्यात आली. ३२ तासांच्या प्रतीक्षेनंतर महामार्ग मोकळा करण्यात यंत्रणा यश आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास सुरुवात झाली. पहाटे तीन वाजता घाट मार्ग कोंडीमुक्त झाला.




