लोणंद येथे युवकास बेदम मारहाण करून दुचाकी हिसकावणाऱ्या फायनान्स कंपनीच्या लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करा-अभिजीत (सनी) ननावरे
— म. प्र. झोपडपट्टी सुरक्षा दलाची मागणी
सातारा / लोणंद –लोणंद येथे फिरोज शेख या युवकाची दुचाकी मोटरसायकल जबरदस्तीने हिसकावून घेऊन त्याला बेदम मारहाण केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत, संबंधित फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे करण्यात आली आहे.
हप्ता थकला असल्याचे कारण पुढे करत, कोणतेही अधिकृत ओळखपत्र नसताना काही फायनान्स कंपन्यांचे लोक जबरदस्तीने मारहाण करून वाहने हिसकावून नेत आहेत. हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून R.B.I. ने बँकिंग प्रक्रिया नियमांमध्ये याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, असे असतानाही फायनान्स कंपन्या नियमांना बगल देत दडपशाही, बळाचा वापर व गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मदतीने वसुली करत असल्याचा आरोप झोपडपट्टी सुरक्षा दलाने केला आहे.
या प्रकरणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत (सनी) ननावरे यांनी, अशा बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई होणे गरजेचे असून, पोलीस प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
येत्या काळात फायनान्स कंपन्यांनी मनमानी पद्धतीने वसुली सुरू ठेवल्यास, संघर्ष नायक मा. भगवानरावजी वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.या मागणीसंदर्भात लोणंद पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.यावेळी श्री. प्रवीण संकपाळ (तालुकाध्यक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल), श्री. सिताराम मसुगडे (फलटण तालुका कार्याध्यक्ष), फिरोज शेख, उमेश गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



