ऐन तारुण्यात हार्ट अटॅक गाठतोय –तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
सातारा : वाढती व्यसनाधीनता, व्यायामाचा अभाव, वाढते मानसिक ताण तणाव हे अलीकडच्या पिढीतील बदल हृदयविकाराला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे जो हार्ट अटॅक पन्नास किंवा पन्नाशीनंतर यायला पाहिजे तो आता तिशी मध्येच, ऐन तारुण्यात गाठतोय, अशी चिंता ख्यातनाम इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केली.
डॉ. जगदीश हिरेमठ यांनी सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये संवाद साधला. यावेळी सातारा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन डॉ. सुरेश शिंदे, डॉ. भास्कर यादव उपस्थित होते.
डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले, लोकांमध्ये सामाजिक, आर्थिक तणाव आहे. स्पर्धात्मक युगात करिअरचा तणाव आहे. मधुमेह, रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, फॅमिली हिस्टरी आणि मानसिक ताण तणाव हे हृदयविकारासाठी रिस्क फॅक्टर आहेत.मानसिक ताणतणाव हा इतर रिस्क फॅक्टर सारखा आपल्याला हाताळता आला पाहिजे. ते न केल्याने ब्लॉक तयार होणे, हृदयविकाराचा झटका येणे या गोष्टी होत असतात. बहुतेक प्रगत राष्ट्र ही यातून पुढे जाऊन स्थिरावली आहेत. भारत हा यातून जात आहे. पुढचे पंधरा-वीस वर्षे आपल्याकडे हेच चित्र पाहायला मिळेल. त्यानंतरच लोकांमध्ये जागृतीच्या गोष्टी अंगवळणी पडतील. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, व्यायाम कसा करावा, वजन कसं नियंत्रणात आणावं हे कळेल. योगासारखा व्यायामाचा प्रकार आणि प्रसार वाढेल. मानसिक शांतता प्रस्थापित होईल आणि मग हळूहळू आपल्याकडे बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम कमी होतील.
ताणतणाव टाळता आले पाहिजेत
मधुमेह, रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल हे मोजता येतं. परंतु कोणाला, किती व कशामुळे मानसिक ताणतणाव आहे हे मोजता येत नाही. हृदयाशी संबंधित आजार हे केवळ महानगरांचे दुःख नाही तर छोट्या छोट्या ग्रामीण भागातही तो बळावतो आहे. कोंडी, प्रदूषण, ताण तणाव, बदलती जीवनशैली या गोष्टी ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यात. शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार, युवकांची लग्न अशी तानाची कारण वेगवेगळी असू शकतात. हा मानसिक तान हाताळता आला पाहिजे. महिलांना जोपर्यंत रजोनिवृत्ती येत नाही तोपर्यंत त्यांचे हार्मोन्स असतात. या हार्मोन्समुळे त्यांचे हृदयाशी संबंधित आजारापासून संरक्षण होत असते. त्यामुळे महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका नॉर्मल केस मध्ये कमी असतो. रुजोनिवृत्तीनंतरची स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये धोक्याचं प्रमाण सम पातळीवर येतं. रुजोनिवृत्ती पूर्वी एखाद्या स्त्रीला मधुमेह असेल, ती तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असेल तर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असतो.
पोटाचा घेर आणि हृदयरोग
पोटाच्या घेराचा आणि हृदयरोगाचा जवळचा संबंध आहे. वैद्यकीय भाषेमध्ये त्याला ‘सेंट्रल ओबेसिटी’ म्हणतात. अशा माणसाच्या शरीराची रचना साधारण शीडशिडीत अशीच असते. तथापि त्याचं पोट वाढलेलं असतं. पोटाची चरबी वाढते त्या वेळेला ती स्वादुपिंडावरती बसते. त्यावेळेला त्यातून निघणारे इन्सुलिन हे कमी प्रभावी होतात. आणि मग त्यातून जाऊन डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि ट्रायग्लीसाराईड सारखे पदार्थ वाढणे, मधुमेहाशी संबंधित हार्ट अटॅक येणार.
