संघर्ष आणि आत्मसन्मान याचा विवेकी आलेख म्हणजे द लेसबियन –सबनीस सर
प्रतिनिधी -शुभांगी दळवी लिखित द लेसबियन या कादंबरीचा नुकताच प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन पुस्तकांवरती चर्चासत्र परिसंवाद आयोजित केले जातात. जेणेकरून अनेक चांगले लेखक समाजापर्यंत पोहोचले जावेत आणि त्यांच्या साहित्यावर साधक-बाधक चर्चा व्हावी. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिरीषचिटणीस असे अनेक उपक्रम आजवर घेत आलेले आहेत. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून द लेसबियन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पडला. त्यामध्ये लेखक आणि कवी स्वप्निल पोरे, कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे, लेखिका सुचित्रा काटकर, अमृता तांदळे तसेच लेखक देवा झिंजाड यांनी कादंबरीवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. ह्या पुस्तकावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि वांग्मयीन मूल्याच्या दृष्टीने अन् कादंबरीच्या कथानकाच्या अंगाने श्रीपाल सबनीस सरांनी अतिशय महत्त्वाची मांडणी केली. संघर्ष आणि आत्मसन्मान याचा एक विवेकी आलेख म्हणून द लेसबियन ह्या पुस्तकाचं त्यांनी वर्णन केलं. महिलांच्या समलिंगी संबंधाच्या अनुषंगाने समाजात असलेले प्रश्न आणि त्यावर उपाय शोधू पाहणारी लेखिका म्हणून शुभांगी दळवी यांचा त्यांनी गौरव केला.
ह्या कार्यक्रमाचे अतिशय अभ्यासपूर्ण असे सूत्रसंचालन श्री चिटणीस यांनी केले. तसेच पुस्तकाच्या लेखिका शुभांगी दळवी यांनी सर्वांचे आभार मानले.
