भिलारमध्ये काळ्या बिबटिणीचा वावर; पिलांसह दर्शनाने परिसरात सतर्कतेचा इशारा
भिलार -महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गाव पुन्हा एकदा बिबट्याच्या वावरामुळे चर्चेत आले आहे. अंजुमन परिसरातील शेताजवळ काळ्या मादी बिबटिणीचे तिच्या पिलांसह दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीही याच परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला होता. त्यानंतर परिस्थिती शांत झाल्याचे वाटत असतानाच पुन्हा झालेल्या दर्शनामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
जंगलातून थेट मानवी वस्तीकडे बिबटिणीने मोर्चा वळवल्याने अंजुमन–भिलार मार्गावरून ये-जा करणारे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक धास्तावले आहेत. हा रस्ता रोजच्या वापराचा असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पाहणी करून बिबटिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे. परिसरात कॅमेरा ट्रॅप बसवणे, आवश्यकतेनुसार पिंजरा लावणे आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे, अशा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांसाठी खबरदारी पहाटे व रात्री एकटे शेतात किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे.लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये.पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.बिबट्याचे दर्शन झाल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी.अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.




