महामार्गावर जीवघेणे भगदाड; नागठाणेजवळ प्रवाशांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
सातारा-सातारा जिल्ह्यातील नागठाणे परिसरातून जाणाऱ्या पुणे –बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि. 29 जून) रस्त्याला मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या भगदाडामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सतर्क प्रवाशांनी वेळेवर इतर वाहनचालकांना इशारा दिल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
पावसामुळे रस्त्याखालील माती वाहून गेल्याने डांबरीकरण खचून मोठे भगदाड पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर संबंधित लेनमध्ये तातडीने कोन लावून वाहतूक सावधगिरीने सुरू ठेवण्यात आली.या मार्गावर दररोज हजारो लहान-मोठी वाहने धावतात. अशा परिस्थितीत वेळेत दखल घेतली नसती, तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता आली नसती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच पावसाळ्यात संपूर्ण महामार्गाची पाहणी करून धोकादायक ठिकाणांची तपासणी करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.




