सामाजिक जडणघडणीसाठी दानशूर वृत्ती जोपासा ..इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांचे आवाहन, घाटदरे येथे अभिष्टचिंतन व्याख्यान
खंडाळा : ध्येयाने प्रेरीत असलेला माणूस आयुष्यात यशस्वी वाटचाल करतो. त्यासाठी विधायक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असते. दया, क्षमा, शांती ही संतांची शिकवण अंगीकारणे मनुष्याच्या कल्याणाचे आहे. जीवनात त्यागी वृत्ती जोपासली तर चांगले कार्य घडू शकते. दान करणाऱ्या माणसाचे हात कधीही रिकामे राहू शकत नाहीत. सामाजिक जडणघडणीसाठी प्रत्येकाने दानशूर वृत्ती जोपासावी असे आवाहन प्रेरणादायी वक्ते, इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केले.
घाटदरे ता. खंडाळा येथे नामदेवराव सोळसकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ लेखक जगन्नाथ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, शामराव गाढवे, उदयआण्णा गाढवे , संभाजीराव साळुंखे, शिवाजीराव सोळसकर, केंद्रप्रमुख सुनिता साबळे यासह प्रमुख उपस्थित होते.
दशरथ ननावरे पुढे म्हणाले, मुलांना घडविणे ही आई वडिलांची मोठी जबाबदारी आहे. माता प्रेम देते माया देते संस्कार देते आणि पित्याच्या धाकामुळे शिस्त लागते त्यामुळेच मुलांच्या आयुष्याला आकार मिळतो. मात्र मुलांनीही वृद्धापकाळात आईवडिलांची सेवा करणे गरजेचे आहे. मातापित्यांची सेवा हाच खरा मानवता धर्म आहे. ज्या घरात वृद्ध आहेत तिथे संस्कार प्रवाहित होतात, त्यामुळे त्या घराचा कोणीही कधीही पराभव करू शकत नाही. ज्या घरात आईवडील नाहीत त्यांना त्यांची खरी किंमत कळते. संकटातून मार्ग काढला की यशाची दारे खुली होतात. जीवनाच्या प्रवासात चांगल्या विचारांची कास धरा. त्याच उदात्त हेतूने मार्गक्रमण करा. शेवटी पेरलं तेच उगवलं जातं हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे विधायक विचारातून सामाजिक विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.