पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबईतही होणार पर्यटक सुरक्षा दलाचा शुभारंभ– पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई
सातारा : पर्यटन विभागाकडून पर्यटक सुरक्षा दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मे महिन्यापासून राबविण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या सुरक्षा दलाने केलेल्या कामगिरीचा सविस्तर आढावा आज पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकीत घेतला.
या बैठकीनंतर मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाबळेश्वर, पाचगणी येथे स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलातील सुरक्षा जवानांची गततीन महिन्यांतील कामगिरी अत्यंत समाधानकारक आहे. या दलातील जवानांचा उपयोग पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गर्दीच्या वेळी नियोजन नेटके करणे, वाहतूक सुरळीत करणे, प्रसंगपरत्वे पर्यटकांमध्ये होणारी वादावादी सोडवणे, रॅश ड्रायव्हिंगला आळा घालणे आदी सर्व कामांसाठी अत्यंत चांगला झालेला आहे, अशी माहिती यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दिली. तसेच या उपक्रमांतर्गत नेमण्यात आलेल्या जवानांनी अत्यंत चांगले काम केले असून याबद्दल या जवानांचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी अभिनंदनही केले.
महाबळेश्वर, पाचगणी येथील या दलाचा अनुभव लक्षात घेऊन, लवकरच मुंबई येथील हॉटेल ट्रायडंट-मलबार हिल या रस्त्यावरील विव्हिंग गॅलरी, गेट ऑफ इंडिया या गर्दीच्या पर्यटन स्थळीदेखील पर्यटक सुरक्षा दलाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी घोषणाही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली. महाबळेश्वर व पाचगणी येथे काम करणाऱ्या दलात महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे अधिकारी, कर्मचारी आहेत. मुंबई येथे या दलामध्ये काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माजी सैनिक कल्याण मंडळातील अधिकारी, कर्मचारी घेण्यात येतील. अशा पद्धतीने पर्यटन विभाग राज्यात पहिल्यांदा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दल निर्माण करत आहे, अशी माहिती मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी दिली.
या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, ‘एमटीडीसी’चे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पोलीस उपअधीक्षक श्री. भालचीम आदी उपस्थित होते.
