Home » राज्य » शेत शिवार » मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये

मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये 

मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये 

मुंबई : यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवला. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उत्तर भारतात तापमान वाढले आहे. दक्षिण भारतात सुरू असलेला जोरदार पूर्वमोसमी पाऊस, दक्षिण चीन समुद्रातील ढग आणि वाऱ्यांची स्थिती, नैऋत्य आणि वायव्य हिंदी महासागरातील वाऱ्याची दिशा आणि वेग मोसमी पावसासाठी पोषक आहे.

गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेच्या आधीच म्हणजेच ३० मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. दरम्यान, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान). यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.

भारताच्या भूमीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देशात व्यापतो.

साधारण मे महिन्यापासूनच राज्यात पाऊस हजेरी लावतो. मात्र तो मोसमी पाऊस नाही. मोसमी पावसाला सुरुवात झाली किंवा मान्सून सक्रिय झाला हे वातावरण, हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबतच्या संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते. केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर १४ वर्षा मापन केंद्रे आहेत. त्यातील ६० टक्के म्हणजे ८ ते १० केंद्रांवर सलग दोन किंवा अधिक दिवस मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर ती मोसमी पावसाची चाहुल असते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जैवविविधतेने नटलेले कास पुष्पपठार

जैवविविधतेने नटलेले कास पुष्पपठार महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगररांगा म्हणजे सह्याद्री. सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसर्गिक खजिनाच सातारा जिल्ह्याला

Live Cricket