पुढील वर्षी होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि अण्णा द्रमुक हे दोन जुने सहकारी पक्ष दीड वर्षानंतर पुन्हा एकत्र
पुढील वर्षी होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि अण्णा द्रमुक हे दोन जुने सहकारी पक्ष दीड वर्षानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. ‘अण्णा द्रमुक युतीचे नेतृत्व करेल आणि या पक्षाचे नेते पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात येईल’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले.
तमिळनाडूत १९६७ पासून म्हणजे गेली जवळपास सहा दशके द्रमुक वा अण्णा द्रमुक हे दोन प्रादेशिक पक्ष सत्तेत राहिले आहेत. यामुळेच काँग्रेस वा भाजप, राष्ट्रीय पक्षांना या दोन प्रादेशिक पक्षांचे हात धरूनच या राज्यात वाटचाल करावी लागते. गेल्या ११ वर्षांत भाजपची देशभर घोडदौड सुरू असली तरी तमिळनाडू, केरळ या दक्षिणेकडील राज्यांचा अपवाद. तमिळनाडूत पक्ष विस्तारण्यासाठी नवीन संसदेत चोल संस्कृतीच्या काळातील प्रतीक असलेला राजदंड (सेन्गोल) बसविणे, संसदेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन समारंभावर तमिळ संस्कृतीची छाप असणे, वाराणसी किंवा गुजरातमध्ये ‘तमिळ संगम’ कार्यक्रमांचे आयोजन असे अनेक प्रयोग भाजपने केले; पण अपेक्षित यश अद्याप मिळालेले नाही.
अण्णा द्रमुक आणि भाजपची पहिली युती १९९८ मध्ये झाली. तेव्हापासून अण्णा द्रमुक आणि भाजप कधी एकत्र असतात तर कधी परस्परांकडे पाठ फिरवतात. २०२१च्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला सत्ता गमवावी लागली. तमिळनाडूत ख्रिश्चन आणि मुस्लिमांची प्रत्येकी सहा टक्के म्हणजे १२ टक्क्यांच्या आसपास मते आहेत. भाजपशी हातमिळवणीमुळे अल्पसंख्याक विरोधात गेले, म्हणून नुकसान झाल्याचा निष्कर्ष अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाने काढला.
युतीची घोषणा होताच अवघ्या २४ तासांत प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात आली. युतीत अण्णामलाई यांचा अडसर होता, असे बोलले जाते. नवे प्रदेशाध्यक्ष नायनार नागेथरन हे अण्णा द्रमुकचे माजी मंत्री आहेत व त्यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. म्हणजेच अण्णा द्रमुकला सोयीच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली.
