सामाजिक दांभिकतेमुळे गांधी विचाराचा पराभव:मुकुंद फडके
दैव जाणिले कुणी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न
सातारा- महात्मा गांधी यांनी केवळ भारताला नाही तर संपूर्ण जगाला अहिंसा आणि सत्य हे दोन मंत्र दिले , पण या दोन मंत्रांचा वापर करताना भारतासारख्या देशामध्ये सामाजिक दांभिकतेचा अडसर आल्याने गांधी विचाराचा पराभव झाला अशी खंत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मुकुंद फडके यांनी व्यक्त केली
ज्येष्ठ लेखक माधव मनोहर जोशी यांनी लिहिलेल्या दैव जाणिले कुणी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढाकाराने दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये संपन्न झाला तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक व शिक्षक प्राचार्य वि ना लांडगे होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक व कवी डॉक्टर राजेंद्र माने उपस्थित होते व्यासपीठावर डॉ सुनिल पटवर्धन,या पुस्तकाचे प्रकाशक हेरंबप्रित प्रकाशनाचे अजित अंतुरकर आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेचे शिरिष चिटणीस उपस्थित होते
गांधीहत्येनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ब्राह्मण समाजाविरुद्ध क्षोभ निर्माण झाला होता त्याची पार्श्वभूमी असलेल्या दैव जाणिले कुणी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना मुकुंद फडके पुढे म्हणाले,महात्मा गांधी यांचे सच्चे अनुयायी कधीही असत्याचा स्वीकार करणार नाहीत आणि हिंसाचारालाही सामोरे जाणार नाहीत.पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये व्यासपीठे गाजवण्यासाठीच महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केला जातो पण त्या महापुरुषांनी घालून दिलेल्या आदर्श नियमांचे पालन मात्र केले जात नाही हा एक प्रकारे गांधी विचाराचा पराभवच आहे.
यावेळी बोलताना डॉक्टर राजेंद्र माने यांनी दैव जाणिले कुणी या कादंबरीचा साहित्यिक आढावा घेतला.या कादंबरीचा फॉर्म वेगळा आहे आणि कादंबरीची मांडणी ही सुटसुटीत आणि ओघवत्या शैलीमध्ये झाली आहे असे त्यांनी सांगितले कोणत्याही घटनेची दुसरी बाजू असते आणि लेखकांनी अनेक वेळा ती दुसरी बाजू सुद्धा तपासायला हवी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली
अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य वि ना लांडगे यांनी सुद्धा या पुस्तकाचे कौतुक करताना कादंबरी लिखाण करताना जे साहित्यिक भान ठेवायला हवे ते लेखकाने ठेवले असल्याचे सांगितले आगामी काळात माधव जोशी यांच्याकडून अशाच गुणवत्तापूर्ण साहित्याची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले लेखक माधव जोशी यांनी आपल्या या पुस्तकाच्या मागील प्रेरणेचा आढावा घेतानाच त्यांच्या इतर कादंबऱ्यांची माहिती यावेळी उपस्थित श्रोत्यांना दिली गांधी हत्येनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जो क्षोभ उसळला होता त्याची पार्श्वभूमी या कादंबरीला आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या काही लोकांकडून माहिती मिळवून या कादंबरीचे लिखाण केले आहे असे त्यांनी सांगितले
या कादंबरीचे प्रकाशन डॉक्टर सुनील पटवर्धन यांच्या हस्ते झाले त्यांनी मिलिंद जोशी यांचे कौतुक केले आणि त्यांच्या आगामी कादंबऱ्याची उत्सुकता आहे असे सांगितले हेरंबप्रीत प्रकाशनाचे प्रकाशक अजित अंतुरकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केलेयावेळी विनया जोशी यांनी कविता सादर केलीवाई येथील श्री बोपर्डीकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
