Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विज्ञान, तंत्रज्ञान व ज्ञान कक्षा ध्यानात घेऊन लेखकांनी लिहावे-कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के

विज्ञान, तंत्रज्ञान व ज्ञान कक्षा ध्यानात घेऊन लेखकांनी लिहावे-कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के

विज्ञान, तंत्रज्ञान व ज्ञान कक्षा ध्यानात घेऊन लेखकांनी लिहावे-कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के

सातारा : ‘भारतातील सर्व भाषांचा विचार करता,संस्कृत,तमिळ,तेलगु,कन्नड, बंगाली, हिंदी या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळाला ,आज मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला असला तरी तो यापूर्वीच का मिळाला नाही हा प्रश्न पडतो.जुने आणि नवे या दोन्हीची योग्य सांगड घालून मानवी मनाचा सर्व मनोव्यापार शब्दात प्रकट करण्याचे सामर्थ्य ज्या भाषेत असते ती भाषा अभिजात असते. मराठी ही अभिजात भाषा झाली असली तरी मराठी भाषेत अजूनही अधिक साहित्य लिहिलेले नाही. आपण बोलतो की ज्ञानाचे पेव फुटलेले आहे. पण तसे काही आढळत नाही. मराठीत प्रचंड साहित्य निर्मिती होण्याची गरज आहे ब्रिटन मधील नुसत्या आत्मचरित्राची संख्या पाहिली. ती कोटीपेक्षा जास्त आहे,तुलनेने मराठीमध्ये मात्र १००० हजार देखील आत्मचरित्रे लिहिलेली नाहीत. त्यामुळेच लेखकांचे पेव फुटलेले नाही,तर मराठीतून असंख्य लोकांनी लिहिण्याची गरज आहे.

मी अलीकडेच रक्त रेखा नावाची एक कन्नड कादंबरी वाचली. या कादंबरीत एका डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या कुटुंबीयांचे व विविध जीवांचे बारकाईने दर्शन घडविलेले आहे. करकरणारा डोंगर कोसळण्याच्या स्थितीत असतो तेंव्हा तिथल्या माणसांच्या आणि अन्य जीवांच्यावर आलेल्या या संकटाने जे मनात काहूर उठते त्या विविध भावकल्लोळाचे दर्शन लेखकाने अतिशय सूक्ष्मतेने वर्णन केले आहे.अगदी साप आणि माणसांचे संवाद यात दाखवले. या कादंबरी अतिशय सकस असून असे ज्ञान ,विज्ञान ,तंत्रज्ञान घेऊन लिहिलेले साहित्य आपल्याकडे दिसत नाही.अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करून साहित्य निर्माण होत आहे,त्यामुळे आता तुमचे साहित्य तपासले जाईल. म्हणूनच विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या कक्षा ध्यानात घेऊन लेखकांनी लिहावे’’ असे विचार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले. ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांनी संयुक्त रित्या आयोजित केलेल्या’ मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे होते.विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय कुंभार,मानव्यविद्या अधिष्ठाता डॉ.अनिलकुमार वावरे,भाषा मंडळाचे प्रभारी संचालक व मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे, उपप्राचार्यडॉ.रामराजे माने देशमुख इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. सातारा जिल्ह्यातील ६० हून जास्त लेखक कवी, या वेळी उपस्थित होते 

       व्याख्यानाच्या प्रारंभी माणूस आणि प्राणी यातील फरक सांगत असताना ते पुढे म्हणाले की इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा सुसूत्र विचार करण्याची बुद्धी माणसाने कमावली आहे. भाषा हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.कुत्रा हा आपल्या सहवासात अनेक काळ असून त्याला माणसाचे इशारे कळतात ,पण कुत्रा भुंकला तरी आपल्याला अजूनही त्याची नीट भाषा कळत नाही. प्राणी आपले पोट भरण्यासाठी अन्न खातात. माणसाला देखील भूक आहे, पण माणसात त्याग करण्याची वृत्ती आपल्याला दिसते. निसर्गदत्त भावना असून देखील आई मुल जेवल्यानंतर जेवते. माणूस नुसता पोटासाठी दाही दिशा फिरणारा नाही. प्राणी जसे मान खाली घालून जेवतात तसा माणूस नाही. पकड हा त्याचा महत्वाचा विशेष आहे.म्हणूनच माणूस स्वतंत्र विचार करणारा आहे. गाईच्या अंगाला गोचीड चिकटलेले असतात पण त्यांना काढण्याची तिच्याकडे पकड नाही. म्हशीला पेढा खावा वाटतो,पण ती माणसासारखे हळू हळू खात नाही. पकड फार महत्वाची आहे जीव व निर्जीव या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर माणूस हा प्रतिसाद देतो.मनात आणले की बदल करू शकतो, माणूस आशावादी आहे, त्याच्यात सरळपणा आणि वाईटपणा त्यादोन्ही गोष्टी आहेत.निखळ हसणे,आणि कुत्सित हसणे या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत. यासर्व भावना व्यक्त करण्यासाठी तो भाषेचा उपयोग करतो. भावनेचे आदान प्रदान करण्याचे सर्वात मोठे शस्त्र हे मानवी भाषा आहे. जगातील विविध भाषिकांची लोकसंख्या त्यांनी यावेळी सांगितली.इंग्रजी भाषिक जगात १५० कोटी असून हिंदी ६१ कोटी ,तसेच मराठी १० कोटीच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले. मुकुंदराज ,संत ज्ञानेश्वर यांचा संदर्भ देत ते म्हणाले की आपण ज्ञानेश्वरी पारायण करत असताना त्यातील ओवींचा मतितार्थ समजून घेतला पाहिजे.मराठी संतानी केलेल्या मराठी आविष्काराचा परिचय करून दिला.त्यांनी पंडीत कवींची आविष्कार पद्धती वेगळी असली तरी – सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो ,कलंक मतीचा झडो यासारखे लेखन त्यांनी चांगले केले आहे. माणसाच्या मनोव्यापाराचा मनाला कुरतडून टाकणारा भाग आपल्याल यमुना पर्यटन मध्ये दिसतो. पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीत नवा विचार येत असल्याचे त्यांनी सांगितले. माणसाच्या मनामध्ये प्रतिकृती जन्माला यावी., कन्नडमधील शिवराम कारंथ ,एस एल. भैरप्पा यांच्या साहित्यातील वास्तव व कल्पकता याची माहिती त्यांनी दिली. कुसुमाग्रजांची पन्नासीची उमर गाठली ही कविता आपल्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या मनोकृतीवर बोलते असे त्यांनी सांगितले. आपण वाकड्या गोष्टी करू नका. मराठी प्रतीची बांधिलकी समजून घ्या. जे कामाचे दाम घेतात त्यांनी,ती कामे कशी करायला पाहिजेत या विषयी सूचक उपदेश त्यातून मिळतो असे ते म्हणाले. मी विज्ञानाचा शिक्षक असलो तरी मी निग्रहाने मराठीत बोलतो. मराठी बोलण्याची लाज वाटता कामा नये उलट विज्ञान देखील मराठी भाषेत सांगितले पाहिजे असे ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले की छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अनेक कार्यक्रम आम्ही घेत आहोत. लोकांचे शिक्षण घडवण्यासाठी हे कॉलेज आहे.आज समाजात दुषित वातावरण असले तरी, प्रबोधनाने ,प्रदुषित वातावरण दूर करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आणि आपली आहे असे ते म्हणाले. 

      कार्यक्रमाच्या प्रारंभी भाषा मंडळाचे संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी मराठी भाषा विभाग आणि भाषा मंडळ यांची वाटचाल सांगून राज्यात आणि राज्याच्या बाहेरच्या सरकारी महाविद्यालय सांखळी गोवा,व राणी चन्नमा विद्यापीठाचा मराठी विभाग ,दैनिक सकाळ, लोक परिवार सामाजिक संस्था अंगापूर यांचेशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यासाठी व समाजासाठी अनेक उपक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य

 शंकरराव उनउने यांचे नावाने स्मृती दालन व मराठी भाषा प्रयोगशाळा उभी राहत असल्याचे सांगून त्यांनी राज्य स्तरावर मराठी कोकणी बोली भाषेतली कविता लेखन स्पर्धा घेतल्याचे सांगितले. या पुढच्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ व मराठी विभाग जिल्ह्यातील सर्व लेखक कवी यांचेशी सुसंवाद ठेवून ज्ञानाची देवघेव करतील असे सांगितले. लोकशाहीच्या रक्षणासाठी साहित्यिक आणि शिक्षक यांनी जागरूक राहून काम केले पाहिजे असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के व विद्यापीठ पदाधिकारी,प्राचार्य यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. आवाहनास प्रतिसाद देत वाई, माण,फलटण,सातारा ,खटाव ,मायणी ,वडूज पाटण परिसरातील ६० चे वर लेखक कवी उपस्थित होते. पुस्तक परीक्षण,निबंध लेखन ,कविता रसग्रहण ,मराठी वक्तृत्व,रांगोळी रेखाटन या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांनी सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले तर आभार डॉ. आबासाहेब उमाप यांनी मानले .या कार्यक्रमासाठी डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा.प्रियांका कुंभार ,प्रा.श्रीकांत भोकरे ,प्रथमेश बाबर,जान्हवी चव्हाण ,समीक्षा चव्हाण इत्यादीनी परिश्रम घेतले . महाविद्यालयातील विविध विषयाचे प्रमुख ,प्राध्यापक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 545 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket