बोपेगावकरांनी सरपंच केले म्हणूनच मंत्रीपदापर्यत झेप घेऊ शकलो : नामदार मकरंद पाटील
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बोपेगावच्या सरपंचपदापासून झाली. बोपेगावकरांनी विश्वास टाकल्यानेच पुढे संधी मिळत गेली व आज मंत्रिपदापर्यंत झेप घेऊ शकलो असे उद्गार मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांच्या ८७ व्या जयंती व नामदार मकरंद पाटील हे मंत्री झाल्याबद्दल बोपेगाव ग्रामस्थांच्यातर्फे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमानिमित्त काढले.
कार्यक्रमास खासदार नितीन पाटील, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र प्रदेश रा. कॉंग्रेसचे सचिव प्रताप पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे, माजी अध्यक्ष उदय कबुले, किसन वीर कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, राजेंद्र तांबे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संजय देसाई, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, पंचायत समितीचे मा. उपाध्यक्ष महादेव मस्कर, शशिकांत पवार, संदीप चव्हाण तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब सोळस्कर म्हणाले राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून काम करीत असताना तात्यांनी सातारा जिल्हा आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी एकसंघ उभा केला. स्वर्गीय तात्यांची राजकीय वाटचाल जपण्याचे व त्यावर चालण्याचे काम मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी केले आहे. नितीन भरगुडे पाटील म्हणाले तात्यांची इच्छापूर्ती खासदार नितीन पाटील यांनी राज्यसभा खासदार होऊन तर आबांनी मंत्री होऊन पूर्ण केली. मंत्री झाल्यावर तसेच बुलढाण्याचे पालकमंत्री झाल्यावर तुमचा कामाचा व्याप जरी वाढला असला तरी तुम्ही मतदारसंघाला काहीही कमी पडू देणार नाही याची खात्री आहे.
यावेळी मकरंद पाटील म्हणाले माझे बोपेगावातील भाषण कधीच पूर्ण झाले नाही. नेहमीच बोपेगावात भाषण करीत असताना माझा कंठ दाटून येतो एवढे प्रेम बोपेगावकरांनी माझ्यावर केले. सरपंच असताना ग्रामस्वच्छता अभियान राबविताना संक्रातीच्या आदल्या रात्री माझ्या बोपेगावातील मातांनी दोन ट्राँली शेणाने संपूर्ण बोपेगावातील्र रस्ते सारविले होते. सर्वांनी परिश्रम घेतले म्हणून अभियानात बक्षीस मिळाले व त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष माझ्याकडे वेधले गेले. मी उपस्थित नसताना माझ्या परस्पर कवठे जिल्हा परिषद गटाचे तिकीट मला देण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले व जिल्हा परिषद सदस्य झालो. पहिल्यांदा आमदारकीला पराभव झाला पण त्याने खचून न जाता निकालाच्या दुस-याच दिवशी त्या निवडणुकीत मला १०० टक्के मतदान केलेल्या किरुंडे गावाला भेट दिली व पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झालो म्हणूनच चौथ्यांदा तुम्ही मला आमदार केलेत. आज बोपेगावकरांनी सर्व पदे उपभोगलीत. तात्या लोकसभा खासदार झाले, जिल्हा बँक चेअरमन, राज्यसभा खासदारकी नितीनकाकांच्या रूपाने बोपेगावकरांना मिळाली फक्त तात्यांना आमदार व मंत्री होता आले नाही ते माझ्या रूपाने बोपेगावकरांना मिळाले. त्यामुळे बोपेगावकर संतुष्ट झालेत. यावेळी बोपेगावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने नामदार मकरंद पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल शिंदे यांनी केले.
