महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या साताऱ्यातील पालीच्या खंडोबा यात्रेला शनिवारी सुरूवात झाली
सातारा प्रतिनिधी -खंडोबाच्या नावानं चांगभलं, यळकोट..यळकोट जय मल्हारचा गजर आणि भंडाऱ्याच्या उधळणीत खंडोबा-म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा शनिवारी गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. यात्रेला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील सुमारे पाच लाखांवर भाविक उपस्थित होते.
गोरज मुहूर्तावर शाही विवाह संपन्न : खंडोबा-म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा शनिवारी गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. यावेळी लाखो भविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट.. येळकोट.. जय मल्हारचा गजर केला. भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीत पाल नगरी न्हाऊन निघाली. खंडोबा देवाच्या यात्रेचा शनिवारी मुख्य दिवस असल्यानं लाखो भाविक पाल नगरीत दाखल झाले होते.वाळवंटात बांधलेल्या पुलावरील मुख्य मिरवणूक मार्गावरुन रथ आल्यानंतर लाखो भाविकांनी रथावर भंडारा, खोबऱ्याची उधळण केली. मंदिरासमोरील काशिळ-तारळे पूल, तारळी नदीपात्रातील दक्षिणोत्तर बाजू भाविकांनी खचाखच भरली होती. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळं यात्रेचा मुख्य दिवस निर्विघ्न पार पडला.