नवीन शैक्षणिक धोरणानुसार चाटे शिक्षण समुहाने बदल स्वीकारले –प्रा.गोपीचंद चाटे
सातारा : चाटे शिक्षण समूह हा महराष्ट्रातील सर्वात विद्यार्थीप्रिय समूह असून बदलत्या शैक्षणिक गरजांचा विचार करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चाटे पॅटर्नमध्ये बदल केले आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी सज्ज आहे, असे चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. गोपीचंद चाटे यांनी सांगितले. ते चाटे शिक्षण समूह आयोजित यश पर्व या कार्यक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृह, सातारा या ठिकाणी बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये चाटे शिक्षण समूह, सातारा शाखेचे व्यवस्थापक प्रा.राजेंद्र घुले यांनी विद्यार्थी-पालकांना बौद्धिक मेजवानी मिळावी आणि यशाकडे झेपावताना विद्यार्थ्यांच्या पंखात ज्ञानाचे बळ द्यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगून सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला.
चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागाचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. सर्जेराव राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासावर नकारात्मकतेचा परिणाम होऊ न देता तंत्रज्ञानाचा ध्यास घेवून भव्य ध्येय साध्य करण्यासाठी अमूल्य वेळेचा उपयोग करावा. विद्यार्थी-जीवनामध्ये स्वतःचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी ज्ञानसाधना करावी व शिक्षकांसोबत आईवडिलांची मान अभिमानाने उंचावेल यासाठी सातत्यपूर्ण कठोर परिश्रम करावेत असे सांगितले.
या कार्यक्रमामध्ये चाटे ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी कु.श्रिया पाटील हिने यशपर्व हा प्रवास सोपा आहे परंतु त्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. ध्येय ठरवणे आणि ते साध्य होईपर्यंत सातत्य ठेवणे नितांत गरजेचे आहे असा सल्ला दिला. कार्यक्रमामध्ये भास्कराचार्य टॅलेंट सर्च परीक्षेतील काही प्रातिनिधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, चाटे शिक्षण समूह, पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा. विजय बोबडे, प्राचार्या रंजना जाधव, प्रा. तुळशीदास डोईफोडे, प्रा. मधुकर जाधव, प्रा. दत्तात्रय सानप, प्रा. रूपेश ससाणे यांच्यासह चाटे शिक्षण समुहाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.