Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दर्जेदार ऊस बेणे उपलब्धततेसाठी शासकीय कृषी महाविद्यालय, कराडचे कौतुकास्पद प्रयत्न! -श्री.अतुल म्हेत्रे

दर्जेदार ऊस बेणे उपलब्धततेसाठी शासकीय कृषी महाविद्यालय, कराडचे कौतुकास्पद प्रयत्न! -श्री.अतुल म्हेत्रे

दर्जेदार ऊस बेणे उपलब्धततेसाठी शासकीय कृषी महाविद्यालय, कराडचे कौतुकास्पद प्रयत्न! -श्री.अतुल म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कराड

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, कराडच्या सैदापूर प्रक्षेत्रावर ऊस बेणे लागवड करण्यात येत आहे. वास्तविक पाहता, सैदापूर प्रक्षेत्र नुकतेच कृषी महाविद्यालयास हस्तांतरित झाले आहे. तथापि, सद्यस्थितीत कृषी महाविद्यालयाकडे असणारे अपुरे मनुष्यबळ, आर्थिक व सिंचन समस्या अशा इतर अनेक अडचणींवर मात करीत महाविद्यालयाने ऊस बीजोत्पादनासाठी जमीन तयार करून घेतली असून ऊस बेणे लागवडीस सुरुवातही केलेली आहे. या सर्वांचा विचार करता शेतक-यांना दर्जेदार ऊस बेणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी महाविद्यालय करीत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन कराड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मा. श्री. अतुल म्हेत्रे यांनी केले. शासकीय कृषी महाविद्यालय, कराडच्या सैदापूर प्रक्षेत्रावर आयोजित ऊस बेणे लागवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव पाटील तसेच कृषी महाविद्यालयाचे इतर सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी श्री. अतुल म्हेत्रे यांचे हस्ते ऊस बेणे लागवड करून महाविद्यालयाच्या ऊस बिजोत्पादन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

श्री. म्हेत्रे पुढे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की आपला भारत देश हा शेती प्रधान असून शेतक-यांचा विकास झाला तर भारत एक विकसित राष्ट्र होईल. आपण सर्वच या समाजाचे देणेकरी लागतो आणि म्हणूनच जिथे संधी मिळेल तिथे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कार्यतत्पर असले पाहिजे. शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे. त्यांचे हितासाठी तत्पर राहणे हे सर्वच कृषी विषयक संस्थांचे आद्य कर्तव्य आहे. कृषी महाविद्यालय शेतक-यांच्या हितासाठी करीत असलेल्या कार्यामधून महाविद्यालयाची शेतक-यांसाठी असणारी तळमळ दिसून येते असे मत श्री. म्हेत्रे यांनी व्यक्त केले. श्री. म्हेत्रे हे स्वत: एक कृषी पदवीधर असून ऊस बेणे लागवड करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आपल्याला आत्यंतिक आनंद झाल्याचे सांगितले. सैदापूर प्रक्षेत्र जमीन हस्तांतरण व त्यानंतर सदर प्रक्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव पाटील व त्यांचे मार्गदर्शनाखाली इतर अधिकारी तसेच कर्मचारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे श्री. म्हेत्रे यांनी विशेष कौतुक केले त्याचबरोबर सैदापूर प्रक्षेत्राच्या प्रारंभिक विकासासाठी सहाय्य करणाऱ्या शेतकऱ्यांचाही श्री. म्हेत्रे यांनी गौरव केला.

डॉ. शिवाजीराव पाटील यांनी यावेळी सांगितले की राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार या त्रिसुत्रींवर कृषी महविद्यालयालयाचे कार्य चालू आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर को-८६०३२ या लोकप्रिय ऊस वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वाणाचे उत्पादीत करण्यात आलेले बेणे शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. श्री. म्हेत्रे व महसूल विभाग यांनी सैदापूर जमीन हस्तांतरणासाठी केलेल्या सहकार्याबद्दल विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व कुलसचिव यांच्या वतीने डॉ. शिवाजीराव पाटील यांनी याप्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र हसुरे यांनी केले तर श्री. अमित पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुनील अडांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या NSS युनिट कडून श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन

Post Views: 36 यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या NSS युनिट कडून श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील राष्ट्रीय सेवा

Live Cricket