भारताचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानवर १ विकेटने मात, टीम इंडिया आशिया चॅम्पियन चित्रपट पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार राज्यातील सर्व ग्राहक तक्रार आयोगामध्ये ऑनलाइन सुनावणी अनिवार्य आयोगाचे कामकाज सुरू होण्यापासून संपेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे कर्तव्यच – मंत्री ॲड. आशिष शेलार महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी सुटणार; बस आगार येथील सार्वजनिक वाहनतळ प्रकल्पास परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन
Home » ठळक बातम्या » शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे कर्तव्यच – मंत्री ॲड. आशिष शेलार

शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे कर्तव्यच – मंत्री ॲड. आशिष शेलार

शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे कर्तव्यच – मंत्री ॲड. आशिष शेलार

‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनाला जनतेने आवर्जून भेट देण्याचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन

पुढील सहा महिने प्रदर्शन सर्वांसाठी खुले

मुंबई, दि. १३ : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे, सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांची तलवार यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून, सर्व नियम आणि प्रक्रियांचे पालन करत महाराष्ट्रात परत आणणे हे आमचे कर्तव्यच होते. शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनाला भेट देऊन महाराष्ट्राचा हा जाज्वल्य इतिहास समजून घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक डॉ. सभ्यासाची मुखर्जी, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी, विश्वस्त सायरस गुजर आणि शाहीर नंदेश उमप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर नंदेश उमप यांनी पोवाड्याच्या माध्यमातून अफजलखान वधाचा ऐतिहासिक प्रसंग सादर केला. यावेळी ‘दांडपट्टा’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात परत आणला

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार म्हणाले की, शस्त्रे ही केवळ पराक्रमाची प्रतीके नसून ती धैर्य, अभियांत्रिकी कौशल्य, धातुशास्त्र आणि अचूक नियोजनाचे दर्शन घडवतात. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हे नियोजनबद्ध विजयाचे प्रतीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय नियम, प्रथा व संकेतांचे पालन करून प्रदीर्घ वाटाघाटी आणि अथक प्रयत्नांतून हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात परत आणला आहे.

सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या तलवारीबाबतचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाच्या सहकार्याने परराष्ट्र मंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि भारतीय दूतावासाच्या आवश्यक परवानग्या तातडीने मिळविण्यात आल्या. योग्य मध्यस्थी आणि समन्वयातून ही तलवार महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मालकीची म्हणून सन्मानाने परत आणण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याच्या प्रक्रियेचाही उल्लेख करताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून सदस्य राष्ट्रांशी संवाद साधून भारताची बाजू मांडण्यात आली. परिणामी, हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. आज भारतीय नौदलाच्या ध्वजावर आणि पोशाखावरही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा सन्मानाने झळकत आहे, असेही त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, रघुजीराजे भोसले यांची तलवार, सरसेनापती प्रतापराव गुजर यांची तलवार, खंडेराव गायकवाड यांची ढाल, सरदार रास्ते यांचा दांडपट्टा यांसह शिवकालीन आणि समकालीन अनेक ऐतिहासिक शस्त्रे पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन पुढील सहा महिने सर्वांसाठी खुले राहणार असून, मराठी बांधवांसह इतिहासप्रेमी आणि देशभक्त नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले की, ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनाच्या मुंबईतील आयोजनामुळे मराठा आणि शिवकालीन शस्त्रपरंपरेच्या अभ्यासाला नवे आंतरराष्ट्रीय परिमाण मिळाले आहे. वाघनखे आणि रघुजीराजे भोसले यांची तलवार भारतात परत आणण्यासाठी परदेशातील यंत्रणांशी संवाद साधताना आणि वाटाघाटी करताना मराठी माणसाचा बाणा कायम ठेवून उद्दिष्ट साध्य करण्याचा वस्तुपाठ या प्रक्रियेतून मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून ऐतिहासिक वस्तू भारतात आणल्यानंतर त्यांच्या जतनासाठी अत्यंत काटेकोर नियम आणि मानके पाळावी लागतात. त्यामध्ये तापमान नियंत्रण, सुरक्षित अंतर आणि योग्य प्रकाशयोजना यांसारख्या तांत्रिक बाबींचा समावेश असतो. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि संग्रहालयाने या सर्व आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करून प्रदर्शनाची उत्कृष्ट मांडणी केली आहे. पुढील सहा महिने हे प्रदर्शन इतिहासप्रेमी आणि नागरिकांसाठी महत्वाचे आकर्षण ठरेल, असा विश्वासही डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त ऐतिहासिक वाघनखे भारतात परत आणण्याची जबाबदारी शासनाने सांस्कृतिक कार्य विभाग व पुरातत्त्व संचालनालयाकडे सोपवली होती. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत सामंजस्य करार करून ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शन साकारण्यात आले. सातारा, कोल्हापूर आणि नागपूर येथे या प्रदर्शनाला लाखो नागरिकांनी भेट दिली. ऐतिहासिक शस्त्रांचे जतन, संवर्धन व दस्तऐवजीकरणाचा आदर्श या उपक्रमाने निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

भारताचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानवर १ विकेटने मात, टीम इंडिया आशिया चॅम्पियन

भारताचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानवर १ विकेटने मात, टीम इंडिया आशिया चॅम्पियन ओमान : मोहित उल्वा याने शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ३

Live Cricket