स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर यश
नवी मुंबई देशात प्रथम; विटा, पाचगणी, रत्नागिरी आणि पिंपरी-चिंचवडचाही गौरव
नवी दिल्ली, दि. ११: केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयामार्फत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ च्या दहाव्या आवृत्तीत महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, विटा आणि पाचगणी या शहरांनीही विविध लोकसंख्या गटांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच रत्नागिरी नगरपरिषदेने स्वच्छ तटीय शहरांच्या श्रेणीत तृतीय क्रमांक, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने राज्यातील प्रथम स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला आहे.
विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल, राज्यमंत्री तोखन साहू, सचिव सत्येंद्र सिंह यांच्यासह देशभरातील महापौर, महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणींतील विजेत्या शहरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विटा आणि पाचगणीची राष्ट्रीय स्तरावर कामगिरी
सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेने २० हजार ते ५० हजार या लोकसंख्येच्या गटात देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्वच्छता व्यवस्थापन, नियमित कचरा संकलन, कचऱ्याचे वर्गीकरण आणि नागरिकांचा सहभाग या माध्यमातून विटा शहराने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पर्यटननगरी पाचगणीनेही 20 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या लहान शहरांच्या श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद यश संपादन केले आहे.
स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी : राष्ट्रपती
पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. स्वच्छता हा केवळ सार्वजनिक परिसराच्या सौंदर्याचा विषय नसून नागरिकांचे आरोग्य, सामाजिक संवेदनशीलता आणि प्रशासकीय जबाबदारीशी संबंधित महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘बढाएं हाथ, करें सफाई साथ’ या संकल्पनेतून नागरिकांच्या सक्रिय सहभागाने स्वच्छतेची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशात शहरी कचरा प्रक्रियेचे प्रमाण ८० टक्क्यांवर
केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात झालेल्या प्रगतीची माहिती दिली. वर्ष २०१४ मध्ये शहरी कचऱ्यावर केवळ १६ टक्के प्रक्रिया होत होती. हे प्रमाण आता ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. देशातील ९६ टक्क्यांहून अधिक घरांमधून घरपोच कचरा संकलन केले जात असून, ४ हजार ७५१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची व्याप्ती पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.



