Home » राज्य » शेत शिवार » दुष्काळाच्या काळोखात शेतकऱ्यांसाठी आशेचा दीप : महात्मा फुले

दुष्काळाच्या काळोखात शेतकऱ्यांसाठी आशेचा दीप : महात्मा फुले

दुष्काळाच्या काळोखात शेतकऱ्यांसाठी आशेचा दीप : महात्मा फुले

अन्नदात्याच्या वेदना जाणणारा, शेतकऱ्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा देणारा आणि संकटाच्या काळात माणुसकीचा हात पुढे करणारा महात्मा जोतिराव फुले यांचा सेवाभाव आजही प्रेरणादायी आहे.

इ.स. १८७६-७८ या काळात महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. पावसाने पाठ फिरवली, शेतजमिनींचा कस हिरावला गेला, विहिरी आणि तलाव आटले, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशाही हळूहळू मावळू लागली. हिरव्यागार शिवारांची जागा रखरखत्या माळरानांनी घेतली. शेतात पिके उगवेनाशी झाली, जनावरांसाठी चारा मिळेनासा झाला आणि उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले. अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे दुःख समजून घेणारे आणि त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावणारे महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य विशेष स्मरणीय ठरते.

महात्मा फुले यांच्यासाठी शेतकरी हा केवळ अन्नधान्य पिकवणारा घटक नव्हता, तर समाजाच्या जीवनचक्राचा आधार होता. शेतकऱ्याच्या घामातूनच समाजाचे पोट भरते, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींकडे त्यांनी केवळ सहानुभूतीने नव्हे, तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पाहिले. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांचे दुःख, उपासमारीची भीषणता आणि ग्रामीण जीवनाची झालेली परवड याविषयी त्यांना मनस्वी कळकळ होती.

दुष्काळाच्या या संकटात महात्मा फुले यांनी पुणे नगरपालिकेतील आपल्या कार्याचा उपयोग लोकहितासाठी केला. दुष्काळामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या कुटुंबांतील लहान मुले उपेक्षित राहू लागली. या निराधार बालकांना अन्न, निवारा आणि मायेचा आधार मिळावा, या उद्देशाने १७ मे १८७७ रोजी ‘व्हिक्टोरिया बालाश्रम’ सुरू करण्यात आला. सत्यशोधक समाजाच्या सहकार्याने चाललेल्या या उपक्रमातून दुष्काळग्रस्त बालकांना मदतीचा हात मिळाला.

या कार्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे होते. सावित्रीबाई फुले यांनी दुष्काळग्रस्त भागांत जाऊन मदतकार्य केले. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी अन्न, पाणी आणि कपड्यांची मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. अन्नछत्रांच्या माध्यमातून भुकेलेल्यांना अन्न देणे, निराधारांना आधार देणे आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांना दिलासा देणे, या सेवाकार्यात फुले दाम्पत्याने माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या कार्यामागे प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती; दुःख दूर करण्याची तळमळ होती.

महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांविषयीचे चिंतन केवळ दुष्काळापुरते मर्यादित नव्हते. शेतकऱ्यांचे दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, शिक्षणाचा अभाव आणि शेतीसमोरील अडचणी यांचा त्यांनी सातत्याने विचार केला. त्यांच्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. शेतकऱ्याला ज्ञान मिळाले, त्याच्या श्रमांना योग्य प्रतिष्ठा लाभली आणि त्याला आपल्या हक्कांची जाणीव झाली, तरच त्याच्या जीवनात खरा बदल घडू शकतो, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता.

१८७७ च्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या भूमीवर दुःखाच्या खोल खुणा उमटवल्या; मात्र याच काळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सेवाकार्याने माणुसकीचा प्रकाशही पसरवला. संकटाच्या काळात केवळ दुःख व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे, हीच त्यांच्या कार्याची खरी शिकवण आहे.

आजही दुष्काळाच्या झळा बसतात, पाण्यासाठी शिवार आसुसते आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंतेचे ढग दाटतात. अशा वेळी महात्मा फुले यांचे विचार आपल्याला दिशा देतात—शेतकऱ्याच्या घामाचा सन्मान करा, गरजूंच्या पाठीशी उभे राहा आणि समाजातील शेवटच्या माणसापर्यंत मदतीचा हात पोहोचवा. कारण दुष्काळावर मात करण्यासाठी पाऊस जितका आवश्यक आहे, तितकीच माणुसकीची ओलही आवश्यक आहे.

हेमंतकुमार चव्हाण

जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तेलंगणाच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करताना महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तेलंगणाच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करताना महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा प्रकल्पाच्या परिणामांच्या स्वतंत्र अभ्यासासाठी संयुक्त समिती

Live Cricket