Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. असीम ध्येयनिष्ठेने कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या ३६ पोलीस अधिकारी आणि ११८ पोलीस अंमलदार अशा एकूण १५४ पोलीस हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्रपणे अभिवादन करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून पोलीस हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी यावेळी पुष्पचक्र वाहून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन केले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

विविध देशांच्या दूतावासातील निमंत्रित, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह शहीद पोलिसांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांची भेट घेऊन त्यांना अभिवादन केले. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांनी पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमाचे संयोजन केले.

ज्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेपोटी स्वतःचे प्राण अर्पण केले त्या शूर शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी दि २१ ऑक्टोबर रोजी स्मृती संचलन केले जाते. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्य तसेच अर्ध सैनिक दलातील शहीद झालेल्या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी या पोलीस स्मृतिदिन संचलनाचे आयोजन करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या

Live Cricket