महात्मा गांधी जयंतीनिमित्त वेण्णा लेक परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात; ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत जलस्रोतांच्या रक्षणाचा संदेश
महाबळेश्वर (प्रतिनिधी):राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाबळेश्वर गिरिश्र्थान नगरपरिषदेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जलसंधारण व जलस्रोत स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात राबविण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून जलस्रोतांचे संवर्धन, परिसराची स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा मोलाचा संदेश नागरिकांना व पर्यटकांना देण्यात आला.
महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे निसर्गसमृद्ध पर्यटनस्थळ असल्याने येथील जलस्रोत व परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेदरम्यान वेण्णा लेक परिसरातील कचरा संकलित करून जलस्रोतांची सफाई करण्यात आली.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:
या स्वच्छता मोहिमेत महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक तथा स्वच्छता व आरोग्य सभापती ॲड. संजय बाळकृष्ण जंगम, नगरसेवक राजूभाई नालबंद, अर्बन बँकेचे माजी चेअरमन दत्तात्रय वाडकर, अर्बन बँकेचे विद्यमान संचालक शरद बावळेकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी बोरगे, कुंभार आणि नगरपरिषदेचे सर्व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
”स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी” – ॲड. संजय जंगम
गांधी जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे’ ही जाणीव अधोरेखित करण्यात आली. याप्रसंगी बोलताना स्वच्छता व आरोग्य सभापती ॲड. संजय जंगम म्हणाले, “महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळात जलस्रोतांची स्वच्छता आणि पर्यावरणाचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारच्या मोहिमांमुळे नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होते.”
नगरपरिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’* अंतर्गत राबविण्यात आलेल्या या यशस्वी उपक्रमामुळे स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक महाबळेश्वर घडविण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ झाला आहे. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून विशेष कौतुक होत आहे.



