जावळी तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा; केळघर विकास सेवा सोसायटीचा ठराव
केळघर प्रतिनिधी :जावळी तालुक्यातील केळघर परिसरात प्रमुख पीक असलेल्या भातासह इतर पिकांची अवस्था पावसाअभावी चिंताजनक असल्याने जावळी तालुक्यात राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा असा ठराव केळघर विकास सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळ व सभासदांच्या वतीने सरकारला पाठवणार असल्याची माहिती केळघर सोसायटीचे अध्यक्ष सुनील जांभळे यांनी सोसायटीच्या ७६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
केळघर विकास सेवा सोसायटीची वार्षीक सर्वसाधारण सभा नांदगणे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात नुकतीच संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय विकास आधिकारी कृष्णात निकम, विकास अधिकारी अरुण खटावकर,सोसायटीचे उपाध्यक्ष तुकाराम पार्टे,सचिव आनंदा शेलार, संचालक रामभाऊ शेलार, एम. एस. पार्टे,हरिभाऊ शेलार, संजना शिंदे,दिलीप पाटील,जगन्नाथ शेलार, संपत सुर्वे,शिवाजी चव्हाण, लक्ष्मण जाधव ,नारायण जाधव, शशिकांत शेलार यांची उपस्थिती होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.
सभासदांना १०%लाभांश देणार असल्याचे अध्यक्ष जांभळे यांनी सांगितले. केळघर परिसरात पिकांची अवस्था पावसाने दडी मारल्याने चिंताजनक असल्याने तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा यासाठी सोसायटीने ठराव करावा अशी मागणी ज्येष्ठ सभासद वसंतराव चव्हाण यांनी केली. त्यावर अध्यक्ष जांभळे यांनी हा ठराव सोसायटीच्या वतीने तातडीने ठराव पाठवणार असल्याचे सांगितले., यावेळी सोसायटीच्या वतीने देण्यात आलेल्या कर्जाची मुदतीत फेड केलेल्या सभासदांचा सत्कार सोसायटीच्या वतीने करण्यात आला. तसेच येथील श्री भैरवनाथ विद्यालयाला सोसायटीच्या वतीने दहा हजार व प्राथमिक शाळेला पाच हजारांची देणगी देण्यात आली. सचिव आनंदा शेलार यांनी अहवालवाचन केले. संचालक रामभाऊ शेलार यांनी आभार मानले.





