एकनाथ ओंबळे यांचा इशारा; जावळी दुष्काळग्रस्त घोषित करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
सातारा : जावळी तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शिवसेनेचे सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जावळी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जावळी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख श्री. एकनाथ ओंबळे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जावळी तालुक्यात पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेले भातपीकही करपून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेजारील महाबळेश्वर तालुक्यात तुलनेने अधिक पाऊस झालेला असतानाही जावळी तालुक्याचा दुष्काळग्रस्त म्हणून विचार झालेला नाही, अशी खंत ओंबळे यांनी व्यक्त केली. प्रशासनाने जावळी तालुक्यातील परिस्थितीची तातडीने पाहणी करून सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जावळी तालुका लवकरात लवकर दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी. येत्या दोन दिवसांत जावळी तालुका दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास जावळी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.




