सातारा जिल्हा बँकेसाठी पहिल्याच दिवशी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल खा.उदयनराजे, संजीवराजे, सुरभी भोसले यांच्यासह विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज;२८ सप्टेंबरपासून पुन्हा नामनिर्देशनाची प्रक्रिया.
सातारा प्रतिनिधी -सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, सातारा या बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत विविध मतदारसंघातून एकूण ६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली, तर विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष, कोरेगाव तालुका मतदारसंघातून सुनील रवेलचंद खत्री यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत.
गृहनिर्माण सहकारी संस्था तसेच दूध उत्पादक संस्था, पशुपैदास, वराह पालन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन संस्था मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष, फलटण तालुका मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गातून दीपक प्रल्हाद चव्हाण, नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदारसंघातून सुरभी मदन भोसले, तर महिला राखीव प्रवर्गातून अनुपमा शाहूराज फाळके यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, दि. २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय सुट्टी असल्याने या दोन दिवशी नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृतीचे कामकाज होणार नाही. त्यानंतर दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत.
निवडणूक कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे, इतर सोबत्यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सत्य सह्याद्री
निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी केले आहे.




