Home » राज्य » पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुक जाहीर सातारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुक जाहीर सातारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुक जाहीर सातारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू

आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या सूचना

सातारा: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे.

पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी विभागीय आयुक्त, पुणे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून विभागातील संबंधित जिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 29 सप्टेंबर 2026 निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर, 2026., उमेदवारी अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर 2026 रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026 असून

मतदान 23 ऑक्टोबर 2026, सकाळी 8 ते सायंकाळी 4 होणार आहे. 

मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026 होणार असून निवडणूक प्रक्रिया 

31 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्ण होईल. 

 

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हास्तरीय सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली असून, भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेतील तरतुदी तसेच निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदर्श आचारसंहितेबाबत आवश्यक सूचना द्याव्यात. शासकीय यंत्रणेचा, शासकीय वाहनांचा, मनुष्यबळाचा अथवा शासकीय साधनसामग्रीचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या प्रचारासाठी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नवीन विकासकामे, उद्घाटने, भूमिपूजन, शासकीय जाहिराती व इतर बाबींबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.  

आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सार्वजनिक मालमत्ता विद्रुपण प्रतिबंधक कायदा तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे, राजकीय पदाधिकाऱ्यांचे किंवा संभाव्य उमेदवारांचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, भित्तीपत्रके, फलक व इतर प्रचार साहित्य हटविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

शासकीय इमारती, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक मालमत्ता तसेच सार्वजनिक वापराच्या ठिकाणी आढळणारे अनधिकृत राजकीय प्रचार साहित्य तातडीने हटविण्यात यावे. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, राजकीय पदाधिकारी, संभाव्य उमेदवार, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संतोष पाटील जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड वाई : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वाई येथील वकील

Live Cricket