जनता अर्बन बँक निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा विजय

वाई प्रतिनिधी -वाई येथील जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत उलथापालथ झाली असून परिवर्तन पॅनलने संस्थापक पॅनलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत ११ जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेवर तात्याबा बबन धायगुडे हे अगोदरच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १० जागांसाठी सोमवारी झालेल्या मतमोजणीत परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत विजयाची मुहूर्तमेढ रोवली. खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वात सहकारी बँका वाचल्या पाहिजेत या निर्धाराने परिवर्तन पॅनेलने आपला करिष्मा दाखवून दणदणीत विजय मिळविला आहे.
सर्वसाधारण मतदारसंघ मधुकर मोरे शेखर फरांदे (पाचवड) ३५५७, (ओझर्डे) ३१९२, राहुल डेरे (कवठे) ३१८३, तानाजी जाधव (विठ्ठलनगर, खेड) ३१६७, सुभाष नवले (आनंदवाडी, सातारा) ३१५०, महेंद्र जमदाडे (फुलेनगर, वाई) २७२५ मते, महिला राखीव मतदारसंघ वैशाली चव्हाण (सुरूर) ३४०७, रेखा पिसाळ (व्याजवाडी) ३१८४. अनुसूचित जाती/जमाती राखीव अजय गायकवाड (कडेगाव) ३३४७, इतर मागास प्रवर्ग राखीव बाळकृष्ण सपकाळ (यशवंतनगर, वाई) ३३२८, तात्याबा धायगुडे बिनविरोध. विजयी उमेदवारांचे बँकेच्या सभासदांनी व हितचिंतकांनी अभिनंदन केले असून वाई शहरात जल्लोषाचे वातावरण आहे.




