सेवा संकल्प अभियानांतर्गत कराडमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासह संबंधित विभागांचा सहभाग; १५० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
कराड: सेवा संकल्प अभियानांतर्गत कराड येथे आज विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय योजना व सुविधांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा व शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा जवळपास १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
शिबिरामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण विभाग, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तसेच संबंधित शासकीय विभागांच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये शिष्यवृत्ती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आणि जात प्रमाणपत्र पडताळणी याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच स्टॅंड अप इंडिया योजनेबाबत संबंधित विभागाच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. स्वयंरोजगार व उद्योग सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या कर्जसुविधा, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भातील प्रश्नांचे निरसन यावेळी करण्यात आले.सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या योजना व सेवांची माहिती विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.





