गणराया ॲवार्ड २०२६ साठी सर्व गणेशोत्सव मंडळांना सातारा पोलीस दल यांचे आवाहन

गणेशोत्सवातील शिस्त, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरकता व कायद्याचे पालन करणाऱ्या मंडळांचा होणार गौरव
सातारा -सातारा उपविभाग अंतर्गत सातारा शहर, शाहुपुरी, सातारा तालुका व बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळांचे सन्माननीय अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना “गणराया ॲवार्ड २०२६” मध्ये सहभागी होण्याचे आवाहन सातारा पोलीस दल, रोटरी क्लब ऑफ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, महिला सहभाग, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सामाजिक प्रबोधन तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन यांचा आदर्श निर्माण करणारा उत्सव व्हावा, या उद्देशाने गणराया ॲवार्ड २०२६ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर पुरस्कारासाठी प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतून १० पारितोषिके देण्यात येणार आहेत. मंडळांनी मागील वर्षभरात तसेच यावर्षीच्या गणेशोत्सव कालावधीत केलेल्या विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे, गणेशोत्सवातील शिस्तीचे तसेच विसर्जन मिरवणुकीतील नियोजनाचे परीक्षण करून गुणांच्या आधारे उत्कृष्ट मंडळांची निवड करण्यात येणार आहे.
गणराया ॲवार्डच्या परीक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ सातारा व सातारा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी संबंधित गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन परीक्षण करणार आहेत.
गणराया ॲवार्ड २०२६ – परीक्षणाचे निकष
अ. कायद्याचे पालन – एकूण ४० गुण
१. वेळेवर गणेशमूर्ती स्थापना, पावित्र्य व परिसर स्वच्छता – ४ गुण
२. मंडळ परिसरातील पार्किंग व अग्निशमन व्यवस्था – ८ गुण
३. धर्मादाय आयुक्त परवाना, मंडळ परवाना, पोलीस ठाण्याचा परवाना व नियमानुसार मंडप व्यवस्था – २० गुण
४. दररोज रात्री देखावा बंद करण्याच्या वेळेचे पालन – ८ गुण
ब. मंडळाच्या वर्षभरातील उपक्रमांचे परीक्षण – एकूण ४० गुण
१. आरोग्यविषयक उपक्रम / व्याख्याने – ८ गुण
२. शैक्षणिक उपक्रम – ८ गुण
३. क्रीडाविषयक उपक्रम व जनजागृती – ८ गुण
४. सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम – ६ गुण
५. पर्यावरणविषयक उपक्रम / वृक्षारोपण – ६ गुण
६. महिलांचा सक्रिय सहभाग / महिला संचालक – ४ गुण
क. गणेशोत्सव कालावधीतील परीक्षण – एकूण ४० गुण
१. आरास व देखावा – ८ गुण
२. लाऊडस्पीकरसंबंधी नियमांचे पालन – ८ गुण
३. राबविण्यात आलेले विधायक उपक्रम – ८ गुण
४. संरक्षण स्वयंसेवक, पहारेकरी व CCTV व्यवस्था – ४ गुण
५. गर्दी नियंत्रणाची व्यवस्था – ४ गुण
६. सजावटीचा प्रभाव – ८ गुण
ड. गणेश विसर्जन मिरवणुकीचे परीक्षण – एकूण ४० गुण
१. गुलाल व फटाक्यांचा वापर न करणे – ४ गुण
२. मिरवणूक विनाकारण रेंगाळणार नाही याची दक्षता – ४ गुण
३. स्वयंसेवक सक्रियपणे कार्यरत असणे – ४ गुण
४. पोलिसांच्या सूचनांचे व आदेशांचे पालन – ४ गुण
५. पालखीमधून मिरवणूक – ४ गुण
६. मिरवणुकीतील देखावा – ४ गुण
७. नशापानास प्रतिबंध / नशामुक्त मिरवणूक – ४ गुण
८. वाहनास आवश्यक परवाना असणे – ४ गुण
९. पर्यायी विद्युत व्यवस्था – ४ गुण
१०. इतर गणेशोत्सव मंडळांशी समन्वय व सहकार्य – ४ गुण
इ. गणेशोत्सव परीक्षण समितीचे विशेष गुण – ४० गुण
गणेशोत्सव परीक्षण समितीमार्फत मंडळाच्या एकूण नियोजन, नावीन्यपूर्ण उपक्रम, सामाजिक संदेश, शिस्त, जनजागृती व उत्सवाच्या सर्वांगीण गुणवत्तेच्या आधारे ४० विशेष गुण देण्यात येतील.
ई . पोलीस ठाणे यांचे सर्वसाधारण व वैयक्तिक मूल्यांकन – २० गुण
संबंधित पोलीस ठाणेकडून मंडळाच्या एकूण कार्यपद्धती, शिस्त, कायद्याचे पालन, सामाजिक बांधिलकी, पोलीस प्रशासनाशी समन्वय व गणेशोत्सवातील योगदानाच्या आधारे २० गुणांचे सर्वसाधारण व वैयक्तिक मूल्यांकन करतील.
एकूण – २२० गुण
गणराया ॲवार्डच्या परीक्षणासाठी आवश्यक असलेली परवान्यांची कागदपत्रे, वर्षभरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा व पर्यावरणविषयक उपक्रमांची माहिती, छायाचित्रे, प्रसिद्धीपत्रके, सहभागाचे पुरावे तसेच इतर संबंधित कागदपत्रे मंडळांनी तयार ठेवावीत.
परीक्षणासाठी येणाऱ्या परीक्षकांना व पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांना सदर माहिती उपलब्ध करून द्यावी. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित सातारा शहर, शाहुपुरी, सातारा तालुका किंवा बोरगाव पोलीस ठाण्यात आवश्यक कागदपत्रे व उपक्रमांची माहिती सादर करावी.
“गणराया ॲवार्ड” हे केवळ पारितोषिक नसून मंडळाने वर्षभर केलेल्या सामाजिक व विधायक कार्याची पोचपावती आणि सन्मान आहे. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी उत्साहाने सहभागी होऊन शिस्तबद्ध, सुरक्षित, पर्यावरणपूरक व सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
उपरोक्त आवाहन सातारा पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मा. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, संग्राम शेवाळे, निलेश तांबे, प्रशांत हुले तसेच रोटरी क्लब ऑफ सातारा अध्यक्ष मनोज गायकवाड सचिव ॲड. सुधीर साळुंखे खजिनदार प्रणव भोसले सदस्य :रो. प्रा. डॉ. धनंजय देवी, रो. किशोर डांगे, रो. अभिजित लोणकर, रो. जयंतीलाल पटेल, रो. ॲड. सुनील सांगळे, रो. निलेश शहा, रो. प्रद्युम्न आगटे, रो. उदय कुलकर्णी तसेच रोटरी क्लब ऑफ सातारा येथील सर्व सदस्य यांच्याकडून करण्यात आले.
याचबरोबर एक गाव एक गणपती संकल्पना राबवणाऱ्या सर्व गावांना विशेष गौरव प्रमाणपत्र देण्याची घोषणा मा. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडून करण्यात आली




