महाबळेश्वर: सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा; तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन
महाबळेश्वर (प्रतिनिधी):मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महाबळेश्वर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के आणि पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांना हे निवेदन देऊन मराठा समाजाच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत समाजाचा ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठिकठिकाणाहून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाबळेश्वर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव एकत्र आले. त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी हे निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे समाजाच्या विविध मागण्यांवर आणि आंदोलनाला असणाऱ्या पाठिंब्यावर भर देण्यात आला.
या प्रसंगी समाजातील प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दिलीप वागदरे, राजाभाऊ गुजर, अंकुश बावळेकर, रामदास जाधव, अशोक शिंदे, राजेंद्र पवार, सूर्यकांत जाधव, दीपक बावळेकर, सचिन गुजर, राहुल भोसले, संतोष चिकणे, निलेश धनावडे, श्रीकांत बावळेकर, गणेश जाधव, गणेश बावळेकर, संजय बावळेकर, उमेश बावळेकर, शुभम बावळेकर, धनंजय बावळेकर, बाळू जाधव, संदेश गुजर यांच्यासह शहर व तालुक्यातील इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू राहील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी महाबळेश्वरचा सकल मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, असा सूर या वेळी उपस्थित समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आला.





