केळघर PHC मध्ये CEO नागराजन यांची ‘सरप्राईज व्हिजिट’; औषधसाठा, स्वच्छता अन् रुग्णसेवेची पाहणी
केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास काल सोमवारी रात्री ८ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी आकस्मिक भेट दिली., व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम शेळके व डॉ. समता शेळके यांच्याकडून घेतला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी, परिचारिका अंजुम इनामदार रुग्णवाहिका चालक संदीप बेलोशे शिपाई सुनीता ओंबळे उपस्थित होते. भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी आधिकारी याशनी नागराजन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधत आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा ,रुग्णसेवेचा तसेच औषध साठ्याचा आढावा घेतला. तसेच आरोग्य केंद्रात रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा ,रुग्णांचीदैनंदिन संख्या व व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणी बाबत सविस्तर माहिती आरोग्य अधिकारी यांच्याकडून घेतली.
यावेळी नागराजन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर, स्वछता, आणि आपत्कालीन सेवांची माहिती घेतली. रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.शेळके यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डेंग्यूचा एक रुग्ण उपचारासाठी दाखल असून त्याच्यावर आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहून रुग्णांना वेळेत व आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम शेळके व डॉ.समता शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांचे स्वागत केले.




