साताऱ्यात बंजारा समाजाच्या नव्या पर्वाची मुहूर्तमेढ; जिल्हा मुख्य कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
सातारा : बंजारा समाजाच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचे उद्घाटन माननीय अध्यक्ष, सातारा नगर परिषद श्री. अमोल मोहिते यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज राठोड उपस्थित होते. कार्यक्रमात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा सत्कार सदगुरू सेवालाल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नगरसेवक व सभापती संकेत साठे, रीनाताई तसेच इतर मान्यवर नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला.
संघटनेच्या माध्यमातून झोपडपट्टीधारक व कष्टकरी बंजारा समाजासाठी भरीव कार्य केल्याबद्दल श्री.अर्जुन राठोड यांचा नगराध्यक्ष श्री.अमोल मोहिते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्षांनी बंजारा समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व उदयनराजे भोसले यांच्यासह आम्ही सर्वजण बंजारा समाज व अर्जुन राठोड यांच्या पाठीशी सदैव उभे आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.
उद्घाटन सोहळ्यास फाउंडेशनचे उपाध्यक्ष नामदेव जाधव, राजू चव्हाण, बाबूराव पवार, देऊबा राठोड, महादू चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, कृष्ण राठोड, कृष्णा नाईक, रमेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पश्चिम महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, नव्या कार्यालयाच्या माध्यमातून समाज संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



