विरोधकांकडे विकासाची क्षमता नाही; जिल्हा परिषद-पंचायत समितीत भाजपलाच विजयी करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
केळघर :राजकारणात दिलेला शब्द पाळणे खूप महत्वाचे असते .अशी शिकवण कै. भाऊसाहेब महाराज यांनी मला दिली आहे.मी जावळी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे सलग चार वेळा याच जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले आहे. बोंडारवाडी धरण प्रकल्प संदर्भात विरोधक निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या मनात माझ्या भूमिकेविषयी संभ्रम व गैरसमज निर्माण करत आहेत.
बोंडारवाडी धरण प्रकल्प केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करतील याची पूर्ण खात्री असून विरोधकांकडे जनतेला सांगण्यासाठी काहीच नाही आणि विकासकामे करण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे,असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
जावळी तालुक्यातील कुसुंबी गटातील भाजपच्या उमेदवार अर्चना रांजणे, आंबेघर गणाचे उमेदवार विजय सपकाळ, कुसुंबी गणातील उमेदवार पुष्पा चिकणे यांच्या प्रचारार्थ केडंबे येथे आयोजित कोपरा सभेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मेढ्याचे उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, नगरसेवक शिवाजीराव देशमुख, सुशांत कांबळे, रिकी तिवाटने, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, निर्मला कासुर्डे, बबनराव बेलोशे, सागर धनावडे,कविता धनावडे, बंडोपंत ओंबळे, जयश्री शेलार, शिवाजीराव मर्ढेकर, दत्तात्रय पवार, बळवंत पाडळे, विकास ओंबळे आदींची उपस्थिती होती.
मंत्री भोसले पुढे म्हणाले, बोंडार वाडी धरण प्रकल्पास सर्वप्रथम तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जावळी तालुक्यासाठी कण्हेर जलाशयातून एक टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता.इरिगेशन (सिंचन) विभागाच्या वतीने हे धरण करण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला होता.हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यापासून प्रयत्न करत आहे .याची माहिती धरण कृती समितीला आहे.
विरोधकांनी जावळी तालुक्यात एकही काम आणले नाही. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी मी प्रयत्न केले असून हेही काम लवकरच पूर्ण होणार आहे. सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपने यश मिळवले असून जावळी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे सर्व उमेदवार हे भाजपचे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असून विजयाचा गुलाल फक्त भाजपच्या कार्यकर्त्यावर दिसणार आहे. असा विश्वास व्यक्त करून या निवडणुकीत विरोधकांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी मतदारांनी भाजपला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
ज्ञानदेव रांजणे म्हणाले, जावळी तालुक्यातील सर्वच विकासकामे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनीच केली असून भविष्यात ही राहिलेली कामे तेच पूर्ण करणार आहेत त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेऊन मंत्री भोसले यांची राजकीय ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी विविध गावचे सरपंच, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.




