राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले
“आजच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवपिढीच्या शिलेदारांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आलेली ही ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी कारण,हीच प्रेरणा आपणा सर्वांना विविध समाज घटकात परस्पर सामंजस्य व बंधुभाव दृढ करण्यास उपयोगी ठरेल” अशा आशयाचे प्रतिपादन राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघाचे अध्यक्ष भारत भोसले यांनी केले.ते शाहूपुरी येथील संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या एकात्मता ज्योत प्रज्वलन कार्यक्रमात बोलत होते.राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ, सातारा या संस्थेमार्फत सलग गेली ३४ वर्षे हा एकात्मता ज्योत प्रज्वलन कार्यक्रमाचे प्रजासत्ताक दिनी आयोजित केले जाते.
यावेळी व्यासपीठावर सातारा जिल्हा परिषद गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन आर.के.जाधव,विद्यालयाचे शालाप्रमुख पी.के.दीक्षित,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला खरात, एस.एम.बारंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी आर.के.जाधव यांचे शुभहस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा संपन्न झाल्यानंतर छात्रांनी ध्वजास मानवंदना दिली.यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
याप्रसंगी बोलताना भोसले यांनी,”आपणांस मिळालेले स्वातंत्र्य हे अनेक नामिक-अनामिक क्रांतिकारकांनी दिलेले बलिदान व त्यांचे अपूर्व त्यागातून प्राप्त झालेले आहे.आजच्या प्रजासत्ताक दिनी त्या सर्वांचे स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य असून त्यांचे हौतात्म्य व्यर्थ न जाण्यासाठी आपला देश आणि या मातीत राहणा-या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे सर्वतोपरी हित रक्षणार्थ कटिबद्ध राहण्याचा संकल्प जर आपण या दिवशी केला तरच ख-या अर्थाने हा प्रजासत्ताक दिन साजरा केल्याचे फलित प्राप्त होईल” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्याने जान्हवी बाबर,काजल गवळी,ऋतिका चव्हाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तसेच मुलांचे वतीने मंचावरून सामूहिक देशभक्तीपर गीते सुद्धा सादर करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस.एम.बारंगळे यांनी केले.तर ऋतिका चव्हाण हिने आभार मानले.या कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,आजी-माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.



