न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन
पाचगणी प्रतिनिधी-न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्साहात ‘आर्ट मेला’चे आयोजन करण्यात आले. शाळेच्या सुंदर अॅम्फीथिएटरमध्ये झालेल्या या उपक्रमात विद्यार्थी रंगीबेरंगी वेशभूषेत सहभागी झाले होते.
‘भारतीय संविधानाची प्रस्तावना’ या विषयावर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींमधून न्याय, बंधुता, समता आणि स्वातंत्र्य या संविधानातील मूलभूत मूल्यांचे प्रभावी दर्शन घडले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधून या मूल्यांविषयीची त्यांची समज स्पष्ट झाली.
या प्रसंगी सामाजिक शास्त्र विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व समजावून सांगितले तसेच राष्ट्रनिर्मितीत शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली.
नुकतेच शाळेने आपली ८० वर्षे पूर्ण केल्याबद्दल शाळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनपर पत्र प्राप्त झाले. या पत्राद्वारे त्यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक करण्याचे कार्य पुढेही सुरू ठेवण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या ‘आर्ट मेला’ उपक्रमाला मोठे यश मिळाले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले.
कला, देशभक्ती आणि मूल्यांची सांगड घालणारा हा प्रजासत्ताक दिन सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.



