सांगवी येथे ” बळीराजाचा सन्मान राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव.!
फलटण -सांगवी येथे ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि औद्योगिक सलंग्नता उपक्रम २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय, फलटणच्या कृषी कन्यांनी “राष्ट्रीय शेतकरी दिन” मोठ्या उत्साहात साजरा केला. देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते ‘चौधरी चरण सिंह’ यांच्या जयंतीनिमित्त ’23 डिसेंबर’ हा दिवस देशभरात “राष्ट्रीय शेतकरी दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने शेतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शेतक-यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय शेतकरी दिन हा केवळ एक दिवस नसून, तो अन्नदात्याच्या परिश्रमाची जाणीव करून देणारा आणि शेती क्षेत्राला अधिक सक्षम बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करणारा दिवस आहे, अशी भावना या निमित्ताने व्यक्त झाली.
या दिनाचे औचित्य साधून प्रगतशील ऊस बागायतदार मा. श्री. संजय जगताप यांना निमंत्रित केले होते. तरी त्यांनी ऊस पिकाबद्दल माहिती दिली, त्यामध्ये त्यांनी ऊसाचे कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यायचे व त्यासोबतच मातीची सुपीकता टिकून राहण्यासाठी देखील विविध पर्याय सांगितले. याचबरोबर इतर शेतकऱ्यांच्या ऊस पिकाबद्दल असणाऱ्या समस्यांचे देखील निवारण केले. अशाप्रकारे त्यांनी शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन.एस. धालपे, AIA प्रमुख प्रा. जी. बी. अडसूळ, प्रा. एम. एस. एस. साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या सना शेख, भाग्यश्री जाधव, श्रद्धा राऊत, पूजा सरक, प्राजक्ता सस्ते, सानिका गोफणे यांनी हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला.




