कास पठारावर वनविभाग व कार्यकारी समितीची कडक रात्रगस्त; शिकारीला मोठा आळा
सातारा – निसर्गसंपदेने नटलेल्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठार परिसरात वन्यजीव व जंगल संपदेच्या संरक्षणासाठी वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीने नियमित रात्रगस्त सुरू केली आहे. या संयुक्त गस्तीमुळे बेकायदेशीर शिकारीला मोठ्या प्रमाणात आळा बसला असून वन्यजीव सुरक्षिततेला चालना मिळाली आहे.
कास पठार कार्यकारी समितीचे कर्मचारी तसेच रोहोटचे वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक प्रकाश शिंदे, तुषार लगड, जयंत निकम यांच्या सहभागातून कास पठार परिसरात दिवस-रात्र गस्त घालण्यात येत आहे. रात्रगस्ती दरम्यान साताऱ्याहून कास पठाराकडे येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून संशयास्पद वाहनांची चौकशी करूनच पुढे सोडण्यात येत आहे.
कास पठार परिसरात विपुल प्रमाणात जंगल संपदा असून येथे मौल्यवान औषधी वनस्पती, दुर्मिळ वृक्षप्रजाती आढळतात. या परिसरात एकूण सुमारे २५० कृत्रिम पानवटे असून कास पठार कार्यकारी समितीच्या माध्यमातून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे गवे, रानडुक्कर, भेकर, सांबर, ससा, मुंगूस, बिबट्या, अस्वल आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात येथे आढळतात. कृत्रिम पानवट्यांवर वन्यप्राणी पाणी पितानाची दृश्ये सर्रास दिसून येतात.
सातारा तालुक्यातील अटाळी, कासानी, पाटेघर तसेच जावळी तालुक्यातील कुसुंबी, कास, एकीव ही वनगावे कास पठार परिसरात समाविष्ट आहेत. कास पुष्प पठाराजवळच असलेल्या घाटाई मंदिराच्या देवराईतही अतिशय जुने वृक्ष व औषधी वनस्पतींचा समृद्ध ठेवा आहे. येथे विविध प्रकारचे पशुपक्षी आणि वन्यप्राणी नियमितपणे दिसून येतात.
वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसाची गस्त व रात्रगस्तीचे काम वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक जयंत निकम, तुषार लगड, प्रकाश शिंदे तसेच कास पठार कार्यकारी समितीचे स्वयंसेवक करत आहेत. कासकडे जाणाऱ्या वाहनांची संयुक्तपणे तपासणी केल्यामुळे शिकारी व अवैध हालचालींवर प्रभावी नियंत्रण मिळाले आहे.
वनहद्दीत विनापरवाना प्रवेश किंवा फिरती आढळल्यास कास पठार कार्यकारी समितीमार्फत उपद्रव शुल्क वसूल करण्यात येत आहे. नियमित गस्त, वाहनतपासणी व पाणवट्यांची देखभाल यामुळे कास पठारातील जैवविविधतेचे संरक्षण अधिक बळकट झाले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.




