एपस्टीन फाईलमधील उल्लेखाचं सरकारने स्पष्टीकरण द्यावे – पृथ्वीराज चव्हाण
अमेरिकेच्या न्याय विभागाने लैंगिक शोषणातील आरोपी जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधील हजारो फोटो, ईमेल्स शुक्रवारी रात्री अडीच वाजता (भारतीय वेळेनुसार) सार्वजनिक केले. साधारण तीन लाख दस्तऐवज उघड करण्यात आले.
यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही उल्लेख असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींचा अमेरिकेतील गुन्हेगार एपस्टीनसोबत काय संबंध आहे, त्यांचे नाव त्याच्या फाईल्समध्ये कसे आले, याचा खुलासा भारत सरकारने करावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाण यांनी आधीच दावा केला होता की, एपस्टीन फाईल्स खुल्या झाल्यानंतर भारतीय राजकारणात खळबळ उडणार आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एपस्टीन फाइल्स बाहेर येण्याला सुरुवात झाली आहे. काल (शुक्रवार, 19 डिसेंबर) मोठ्या प्रमाणात माहिती उघड करण्यात आली आहे. सर्व फोटो आणि फाइल्स उघड होण्याला अजून वेळ लागणार आहे. त्यामधील काही ईमेल्समध्ये काही भारतीय नावे पुढे आली आहेत. यामध्ये साधारण 3500 फाईल्स असून हा 300 जीबी डेटा आहे. त्यामुळे या फाईल्समधील सर्व माहिती उघड होण्याला वेळ लागणार आहे. मात्र काही ईमेल्समध्ये पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे मोदी आणि एपस्टीन यांच्यात काय संबंध आहेत, हा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून एपस्टीन फाईल्ससंबंधी बोलत आहेत. शुक्रवारी फाईल्स खुल्या झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उल्लेखावरुन ते म्हणाले की, नरेंद्र मोदींचा संदर्भ यामध्ये आला आहे. तो 2014 चा आहे. तेव्हा जेफ्री एपस्टीनला अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात शिक्षा झालेली होती. त्यामुळे एका गुन्हेगाराशी भारताच्या पंतप्रधानांचा काय संबंध आहे. भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही यातील एका ईमेलमध्ये उल्लेख आहे. पुरी हे भारताचे न्यूयॉर्कमधील राजदूत होते.
एपस्टीन फाइल्स ट्रान्सफरन्सी ॲक्ट 2025 हा कायदा अमेरिकेने पास केला आणि जेफ्री एपस्टीन विरोधात सादर करण्यात आलेले सर्व पुरावे यामध्ये आहेत. हा सर्व दस्तऐवज आता खुला करण्यात आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागने सांगितले आहे की, ही सर्व माहिती उघड करण्याला चार आठवडे लागतील.
भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी या संबंधीचे विधेयक मांडले होते. ही माहिती उघड होऊ लागल्यानंतर त्यांनी म्हटले आही की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ही माहिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे. आम्हाला वाटत नाही की सर्व माहिती उघड होईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
समोर आलेल्या माहितीनुसार काही ईमेल्समध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांची नावे आलेली आहेत. एका ईमेलमध्ये भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचा उल्लेख आहे. भारतातील इतरही काही लोकांची नावे आहेत. त्यासोबत एका ईमेलमध्ये अमेरिकाचा मोठा अधिकारी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन याचा उल्लेख आला आहे. बॅनने एपस्टीनला विचारले होते की, आम्हाला भारताच्या आताच्या पंतप्रधानांना भेटायचे आहे. एपस्टीनकडून त्यांना उत्तर येते की मी प्रयत्न करतो. त्यानंतर काही दिवसांनी एक ईमेल येतो, मोदी ऑन बोर्ड, म्हणजेच मोदी भेटायला तयार आहेत. यावरुन काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल केला की, मोदी आणि एपस्टीन यांचे काय नाते आहे? अमेरिकेतील एक गुन्हेगार एपस्टीन मोदींची कोणासोबतही भेट कशी काय घालून देऊ शकतो? याचे उत्तर भारत सरकारने दिले पाहिजे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीन फाइल्समध्ये कोणकोणत्या भारतीयांची नावे आहेत याचाही खुलासा केला. ते म्हणाले की, यामध्ये उद्योगपती अनिल अंबानी, अमेरिकेत राहाणारे आरोग्य विषयक एक बडे अधिकारी यांची नांवे आहेत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारतीय नेत्यांची नावे यामध्ये आली म्हणजे ते गुन्हेगार आहेत, असे नाही. मात्र अमेरिकेतील लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील गुन्हेगारासोबत भारतातील काही नेत्यांची नावे जोडली जात आहेत, त्याचा खुलासा भारत सरकारने केला पाहिजे.



