दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्व.दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठान वाईचा मदतीचा हात
डॉ.महेश मेणबुधले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द
वाई प्रतिनिधी: दुष्काळाच्या तीव्र झळांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठान, वाईतर्फे सामाजिक उपक्रम म्हणून मदत निधीचा धनादेश आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान करण्यात आला.
डॉ. महेश मेणबुधले यांनी स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन हा मदत धनादेश सुपूर्द केला. शेतकऱ्यांच्या होरपळलेल्या परिस्थितीचा विचार करून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हिंदुराव डेरे, श्रीकांत वालेकर, सुनील जाधव, सोमनाथ राऊत यांच्यासह प्रतिष्ठानचे विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मेणबुधले म्हणाले, “दुष्काळाच्या संकटात शेतकरी एकटे राहू नयेत. समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन त्यांना थोडासा आधार देणे हाच खरा सामाजिक धर्म. प्रतिष्ठानतर्फे हा मदतीचा छोटा हातभार याच भावनेतून दिला आहे.”
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करत इतरही सामाजिक संस्थांनी अशाच पद्धतीने पुढे येण्याचे आवाहन केले.स्व.दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठानचा हा उपक्रम सातारा जिल्यात कौतुकाचा विषय ठरत असून संकटसमयी उभे राहण्याचा संदेश देणारा ठरला आहे.




