जनसामान्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि सुलभ आरोग्यसेवा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एम्स नागपूर येथे मध्य भारतातील सरकारी क्षेत्रातील पहिल्या शासकीय न्यूक्लिक ॲसिड टेस्टिंग लॅब, ब्लड इरॅडिएटर यूनिट आणि असिस्टेड रिप्रोडक्टीव्ह टेक्नॉलॉजी सेंटरचे उदघाटन केले व एम्सच्या अधिकाऱ्यांकडून विविध तंत्रज्ञानाची माहिती घेत पाहणी केली.
या सर्व सुविधा एम्स, नागपूरला रक्त संक्रमण सुरक्षा आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रातील अग्रणी केंद्र म्हणून नवी ओळख मिळवून देतील. या प्रकल्पांमुळे जनसामान्यांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.न्यूक्लिक ॲसिड टेस्टिंग लॅब हे अत्याधुनिक, स्वयंचलित केंद्र असून रक्तदात्यांची तपासणी करताना HIV, HBV आणि HCV सारख्या व्हायरसचे RNA/DNA लवकर ओळखते, ज्यामुळे संक्रमणाचा धोका आणि निदानाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होतो. ब्लड इरॅडिएटर यूनिट हे ट्रान्सप्लांट रुग्ण, सिकल सेल ॲनिमिया रुग्ण यांसारख्या प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी सुरक्षित रक्त संक्रमण सुनिश्चित करणार आहे. तर असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी सेंटर हे वंध्यत्व उपचारासाठी उच्च दर्जाच्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणार आहे.
यावेळी नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, नागपूर एम्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.




