महाबळेश्वर बस आगारात दोन कर्मचाऱ्यांचा इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न
महाबळेश्वर प्रतिनिधी –आज महाबळेश्वर बस आगारात दोन कर्मचाऱ्यांनी छतावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता सूर्यकांत मोहिते हे महाबळेश्वर बस आगारात सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत.
त्यांनी महाबळेश्वर पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार अशोक शंकर सपकाळ वय वर्ष 42 रा.भोलावडे ता.भोर जिल्हा पुणे तसेच विनोद शिवाजी सुतार वय वर्ष 42 रा.कार्वे ता.कराड जिल्हा सातारा हे दोघेही महाबळेश्वर बस आगारात कर्मचारी असून प्राजक्ता सूर्यकांत मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून कर्मचारी अशोक सपकाळ व विनोद सुतार हे दोघेही बदली हेतू प्रयत्न करत होते, परंतु या दोघांनी 24/9/2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बदली होत नाही म्हणून अर्ज केला.
तो अर्ज प्राजक्ता सूर्यकांत मोहिते यांनी पुढील कारवाईसाठी विभागीय कार्यालयाकडे पाठविला असून बदलीचे अधिकार हे विभागीय नियंत्रण राज्य परिवहन सातारा यांच्या अधिकाराखाली येत असून बदलीचा अधिकार माझा नाही असे विनोद सुतार व अशोक सपकाळ यांना वारंवार सांगून देखील तसे त्यांना लेखी पत्र दिले असता त्यांनी नोटीस न घेता उलट अर्जाद्वारे तीन तासात आत्महत्या करेन अशी प्राजक्ता मोहिते यांना धमकी दिली व दमदाटी केली.
असा आरोप मोहिते यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत केल्याचे समोर आले, दरम्यान कर्मचारी अशोक सपकाळ व विनोद सुतार यांनी सांगितल्याप्रमाणे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथील बस आगाराच्या इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने महाबळेश्वर पोलीस प्रशासन, महाबळेश्वर नगरपालिकेची यंत्रणा तसेच महाबळ ट्रेकर्सचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांची समजूत काढून त्यांना खाली उतरविण्यात पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, एसटी महामंडळ व महाबळेश्वर ट्रॅकर यांना यश आले या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष शेलार हे करत आहेत.





