कोरेगाव-वाठार रस्ता खोदून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या शिवसमर्थ कंपनीस ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी – अन्यथा २५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन -मा.रमेशबापू उबाळे
कोरेगाव :कोरेगाव ते वाठार हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून पूर्णतः खोदून ठेवलेला असून, या दरम्यान शेकडो अपघात घडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने व चिखलामुळे दररोज दुचाकीस्वार व प्रवासी अपघातग्रस्त होत आहेत. कोरेगाव पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून गर्भवती महिलेला देखील अपघातामुळे त्रास सहन करावा लागला. अनेक वयस्कर नागरिक व तरुण यांना देखील दुखापती झाल्या आहेत.
याला संपूर्ण जबाबदार शिवसमर्थ कंपनी असून, काम सुरू करून सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. रस्त्यावर दिशा फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेटिंग टेप नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे.
पूर्वी सातारा-पंढरपूर रस्त्यावर मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ६१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता कोरेगाव-वाठार रस्त्यावर तशाच प्रकारचे भीषण संकट ओढवले आहे.
मागण्या :
शिवसमर्थ कंपनीवर चौकशी करून तात्काळ कारवाई करावी.
कंपनीला ब्लॅकलिस्ट करून भविष्यात काम न देणे.
नागरिकांच्या जीवाशी खेळल्याबद्दल संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करणे.
रस्त्याचे काम करताना एका बाजूचा रस्ता खुला ठेवून सुरक्षा उपाययोजना करणे.
अन्यथा, दिनांक २५ सप्टेंबर २०२५ पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
