“फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित”-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबई येथे, मराठी पत्रकार संघाद्वारे ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बुक ‘फिनिक्स’चे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी पत्रकार संघाने दिलेला आणि पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मिळालेल्या या फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे आणि पदाची जबाबदारी सांभाळण्याचे बळ द्विगुणित झाले आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या सन्मानासाठी पत्रकार संघाचे आणि संपादक मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
पत्रकार आणि राजकारणी हे लोकशाहीच्या गाड्याची दोन चाके आहेत. ही दोन चाके एकमेकांसोबत चालली तरच लोकशाही योग्य रुळावर राहते. टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, पण त्याच वेळी आमची बाजूही ऐकून घ्यावी. लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात पत्रकारिता अधिक कठीण झाली आहे. कोविडनंतर तर आव्हान अधिक वाढले. पत्रकार दिवस-रात्र रस्त्यावर असतात. हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ मजबूत राहावा म्हणून सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी याप्रसंगी दिली.
सकारात्मक विचारसरणीने अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणारी कामे करता आली. राज्यशासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग, शेतकऱ्यांची निराशा दूर करणारे उपक्रम हे पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून शक्य झाले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्यांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून जलसंधारणाच्या कामांत योगदान दिले. भारतीय योग, आयुर्वेद, चिकित्सा व परंपरांना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यात पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे मोठे योगदान आहे. भारतीय विचार जगभर पोहचवण्याचे आणि मानवतेचा धर्म शिकवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष अभिमानाची बाब असल्याचे, मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक व इतर मान्यवर उपस्थित होते.
