महाबळेश्वरच्या कृष्णा पवारचे दुहेरी सुवर्ण यश
महाबळेश्वर (प्रतिनिधी):“मेहनत आणि चिकाटीमुळे अशक्यही शक्य होते” याचा प्रत्यय महाबळेश्वरच्या कुमारी कृष्णा प्रमोद पवार हिने घडवून आणला आहे. इंडियन ओपन पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये तिने गोळाफेक आणि थाळीफेक या दोन्ही प्रकारांत अंध वर्गात सुवर्णपदके जिंकून केवळ स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण महाबळेश्वरचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
गिरिस्थान प्रशालेत शिक्षण घेणारी कृष्णा अंधत्वाच्या अडथळ्यांवर मात करून सतत सराव आणि परिश्रमाच्या जोरावर यश मिळवू शकते हे दाखवून दिले आहे. तिच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे शिक्षक, पालक, मित्रपरिवार तसेच स्थानिक नागरिकांत आनंद व अभिमानाची लहर संचारली आहे.
या स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीधर पेटकर तसेच पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेते सचिन खिल्लारी यांचा समावेश होता. त्यांच्या हस्ते कृष्णाला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या या दिग्गज क्रीडापटूंनी कृष्णाच्या जिद्दीचे आणि यशाचे मनापासून कौतुक केले.
कृष्णाच्या यशामागे तिचे प्रशिक्षक डॉ. अक्रम मुजावर (डी.पी. भोसले कॉलेज, कोरेगाव), फिजिकल ट्रेनर शोएब शेख (फ्रेंड्स फिटनेस क्लब, महाबळेश्वर) तसेच मार्गदर्शक राजेंद्र पवार (पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन, सातारा), विक्रम शेंडगे आणि नवनाथ बिडगर यांचे अथक प्रयत्न आणि मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच कृष्णाने आपल्या खेळातील कौशल्य अधिक परिष्कृत केले.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनीही कृष्णा पवारच्या कामगिरीचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मिळालेली ही दखल कृष्णाला आणखी बळ देणारी ठरली आहे.कृष्णाचे यश हे केवळ तिच्यासाठी किंवा तिच्या शाळेसाठीच नाही, तर संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठीही प्रेरणादायी ठरले आहे.
